नंदुरबार : कोरोना पॉझिटिव्हचा आकडा साडेतीनशे पार 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

उपाययोजना राबवूनही संपर्क साखळी तोडण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. जिल्ह्याचा आकडा साडेतीनशेच्या घरात पोचला आहे. तर मृत्यूंची संख्या १८ झाली आहे.

नंदुरबार : जिल्ह्यात शनिवारी (ता. १८) १२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दररोजची पॉझिटिव्ह संख्या वेगाने वाढत आहे. संपर्क साखळीतील रुग्ण असल्याचे सांगितले जात असले तरी उपाययोजना राबवूनही संपर्क साखळी तोडण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. जिल्ह्याचा आकडा साडेतीनशेच्या घरात पोचला आहे. तर मृत्यूंची संख्या १८ झाली आहे. दरम्यान, नंदुरबार व शहादा येथे रविवारी (ता. १९) जनता कर्फ्यू लागू केला आहे. 
जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे वाढणारी संख्या ही चिंता वाढविणारी आहे. सततचे लॉकडाउन, उपाययोजनांची अंमलबजावणी, रस्ते सील, सीमा सील आदी सर्वच उपाययोजना करूनही रुग्णसंख्या वाढतच आहे. वेळोवेळी संपर्क साखळीतील रुग्ण असल्याचे सांगितले जाते. तर मग अद्याप संपर्क साखळी का तुटू शकलेली नाही, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. 

पाच रुग्ण शहाद्याचे 
शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीसह अन्य भागात रहिवासी असलेल्या चौघांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसांत शहादे शहरात नव्याने चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात गरीब नवाज कॉलनीतील दोन, खेतिया रोड परिसरातील एक, तर बेलदार गल्लीतील एका रुग्णाचा व पाडळदा येथील एकाचा समावेश आहे. पालिका व प्रशासनाने कोरोनाबाधित आढळलेला परिसर सील करून सदर भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयितांचे सर्वेक्षण केले जात असून, त्यातील २३ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. मोहिदेतर्फे शहादा येथील विलगीकरण कक्षात यातील काहींना दाखल करण्यात आले आहे. 

नंदुरबार, शहाद्यात कर्फ्यू 
कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नंदुरबार व शहादा शहरात रविवारी (ता. १९) जनता कर्फ्यू घोषित केला आहे. दवाखाने, मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व व्यवहार संपूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. दूध विक्री, वृत्तपत्रवाटप सकाळी नऊला होणार आहे. दरम्यान, श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी खानदेशची कुलदेवता कानूबाईमातेची स्थापना व उत्सव साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समूह संसर्ग टाळण्यासाठी हा उत्सव कौटुंबिक व मर्यादित स्वरूपात साजरा करावा. बकरी ईदचा सणही शासन निर्देशानुसार साजरा करावा. तसेच पुणे, मुंबईसह अन्य शहरांतून विनापास दाखल झालेल्यांची माहिती प्रशासनास देण्यात यावी. अन्यथा कोविड १९ नियमावलीनुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus positive three hundred and fifty case cross