होम आयसोलेशनसाठीचे नियम बसविले धाब्यावर 

धनराज माळी
Tuesday, 8 September 2020

होम आयसोलेशन होणाऱ्यांना उपचारासाठीचे मेडिसीनही दिले जात नाही. ते राहत असलेल्या ठिकाणी आयसोलेशनच्या नियमानुसार सुविधा आहेत की नाहीत याचीही तपासणी केली जात नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.

नंदुरबारः जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, मात्र त्यात रूग्णालयात दाखल होऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी असून होम आयसोलेशन होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र त्यासाठी असलेले सारेच नियम रूग्ण आणि आरोग्य विभागाकडूनही धाब्यावर बसविण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर होम आयसोलेशन होणाऱ्यांना उपचारासाठीचे मेडिसीनही दिले जात नाही. ते राहत असलेल्या ठिकाणी आयसोलेशनच्या नियमानुसार सुविधा आहेत की नाहीत याचीही तपासणी केली जात नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्तीसोबतच आरोग्य विभागही नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे चित्र आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येने साडे तीन हजाराचा आकडा पार केला आहे. नागरिकही त्याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. आजच्या स्थितीत एकूण पॉझिटिव्हची संख्या साडे तीन हजारावर असली तरी त्यापैकी अनेकजण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात रूग्णालयात दाखल रूग्णांची संख्या कमीच आहे. 

साडेआठशे बेड, दाखल रूग्ण ३७६ 
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार साधारण बाराशे आहे. मात्र प्रत्यक्षात उपचारासाठी दाखल रूग्णांची संख्या केवळ ३७६ आहे. याचाच अर्थ सर्वाधिक नागरिक होम क्वारंटाईन होण्यास प्राधान्य देत आहेत. 

४३७ बेड रिकामे 
जिल्हा प्रशासनाने पॉझिटिव्ह रूग्णांसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आयसोलेशन सेंटर कार्यरत केले आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, खासगी दोन कोविड हॉस्पिटलसह आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ८१३ बेडची सुविधा आहे. त्यात केवळ ३७६ बेडवर रूग्ण आहेत. तर ४३७ बेड रिकामे आहेत. बेड उपलब्ध आहेत तर रूग्णांना होम क्वरंटाईन होण्याची परवानगी का दिली जाते हाही मोठा संशोधनाचा भाग बनला आहे. ज्यांना गंभीर लक्षणे नाहीत, अशा रूग्णांना होम आयसोलेशन होण्यास परवानगी देण्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. 

होम आयसोलेशन धाब्यावर 
ज्या रूग्णांना गंभीर लक्षणे नाही, मात्र त्यांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशा रूग्णास त्यांच्या घरी स्वतंत्र खोली, त्यात स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम, इतर नागरिक संपर्कात येऊ शकणार नाहीत असे एकांत ठिकाण असणे आवश्यक आहे. तेही आयसोलेशन करण्यापूर्वी आरोग्य विभागाचा कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन त्या सुविधांची खात्री कऱणे आवश्यक आहे. त्यानंतर होम आयसोलेशनची परवानगी देण्याचे व त्यासोबतच दररोज त्या रूग्णाचा संपर्कात राहून ते रूग्ण औषधोपचार वेळेवर घेत आहेत. की नाही, नियमांचे पालन करीत आहेत की नाही, याबाबत चौकशीची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मात्र प्रत्यक्षात तसे घडतच नाही. होम आयसोलेशन होणाऱ्या व्यक्तींकडे ना आरोग्य विभागाचा कर्मचारी सुविधा तपासायला पोहोचत आहेत. नाही त्यांची दिवसभरात विचारणा केली जात आहे. अनेकांना तर औषधोपचार सुरू झाला की नाही ,याविषयीही कल्पना नसल्याचे वास्तव आहे. 

सेंटर- उपलब्ध बेड व रिकामे बेड 

डिसीएच -१४० -११६ -२४ 
स्मित -४७-४७-०० 
निम्स -३६-३४-०२ 
ग्रेस नवापूर-३०-१२-१८ 
अलसिफा नवापूर-४०-१८-२२ 
ख्रिश्चन दवाखाना-३०-००-३० 
नंदुरबार-२७०-८२-१८८ 
शहादा-१२०-६३-५७ 
नवापूर-५०-४-४६ 
सलसाडी ५०-००-५० 
 
बेड क्षमता-८१३ - दाखल रूग्ण-३७६ - रिकामे बेड-४३७ 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar coronavirus home isolate no rules follow