esakal | दिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus recovery ratio

जिल्हा शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्यानंतर संशयित व्यक्तींची तातडीने तपासणी करण्यात येत असून त्याचा अहवालही वेळेवर प्राप्त होत असल्याने बाधितांवर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे. ८ खाजगी ठिकाणीदेखील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८० टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. मृत्यूदरही २.३ पर्यंत कमी झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपचाराच्या सुविधा आणि बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच त्वरीत उपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. 

जिल्हा शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्यानंतर संशयित व्यक्तींची तातडीने तपासणी करण्यात येत असून त्याचा अहवालही वेळेवर प्राप्त होत असल्याने बाधितांवर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे. ८ खाजगी ठिकाणीदेखील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुक्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात १० मोबाईल टीमच्या सहाय्याने विशेष शिबिराच्या माध्यमातून स्वॅब चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे संसर्ग झालेला असल्यात त्वरीत उपचार करणे शक्य झाले आहे. 

९२० जणांवर उपचार सुरू
महिला रुग्णालयाच्या इमारतीत निर्माण करण्यात आलेल्या नव्या सुविधेमुळे ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेड्सची संख्यादेखील पुरेशा प्रमाणात वाढली आहे. वेळेवर उपचार होत असल्याने बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ५०२६ कोरोनाबाधितांपैकी सुमारे ३९७७ बाधित बरे झाले आहेत. ९२० व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. तर ११६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्‍न 
मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यासोबतच नागरिकांची आरोग्य तपासणी होत आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच त्वरीत तपासणी करून घ्यावी व वेळेवर उचार घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे