म्‍हणूनच दुसरी लाट; बाहेरून येण्याची संख्या वाढली पण चाचण्या घटल्‍या

योगीराज ईशी
Sunday, 22 November 2020

दिवाळीनिमित्‍ताने वर्षभर दूर असलेले परिवारातील सदस्‍य एकत्र येतात आणि दिवाळी साजरी करत असतात. यात कोरोनामुळे मध्यंतरीच्या सात- आठ महिन्यांपासून कोणाची भेट नाही. यामुळे दिवाळीत प्रत्‍येकजण गावी परतले होते. अर्थात दिवाळीच्या काळात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली आणि तुलनेत कोविड चाचणी करण्याचे प्रकाण घटले हेाते.

कळंबू (नंदुरबार) : दिवाळीच्या काळात अनेक जण पुणे, मुंबई, सुरत, नाशिक, बडोदासह इतर शहरातून जिल्ह्यात दाखल झाले. प्रवासाआधी व प्रवासानंतर नागरिकांनी कोरोनाची चाचणी करणे आवश्यक होते; मात्र नागरिकांनी चाचण्या टाळत अनेकांनी दुखणे अंगावरच काढल्याची दिसून आले. 

नोकरी किंवा शिक्षणानिमित्त जिल्ह्यातील अनेक लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात वास्तव्यास आहेत. दिवाळीच्या काळात अनेक जण जिल्ह्यात परतले. कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी नियमानुसार, प्रवाशांनी कोरोनाची चाचणी करणे अपेक्षीत होते. मात्र अनेकांनी प्रवासानंतर कोविड ओपीडीला भेट दिली नसल्याचे वास्तव आहे. मध्यंतरी वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे आढळूनही ते अंगावर काढल्याचे प्रकार घडले आहेत. 

म्‍हणूनच दुसऱ्या लाटेची शक्‍यता
दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने या काळात चाचण्यांची संख्या वाढणे अपेक्षीत होते; मात्र तसे न झाल्याने दिवाळीच्या काळात चाचण्यांचे प्रमाण घटले आहे.महाराष्ट्र सह इतर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र प्रशासनाकडूनही जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची नोंद करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

धोका ओळखावा
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वत: पुढाकार घेतल्यास कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला कमी करणे शक्य आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar coronavirus second stage no testing covid