कोरोनासाठी मोबाईल स्‍वॅब पथक...कसे करतील हे काम

धनराज माळी
Thursday, 30 July 2020

कोरोनामुळे नागरिक जिल्हा रूग्णालयात जाण्यासाठी घाबरतात. साहजिकच आहे; वाढत्या कोरोना संक्रमणामुळे प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत.

नंदुरबार : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता नागरिकांनी निर्भय होऊन, भीती न बाळगता स्वॅब देण्यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे. त्यासाठी नंदुरबार शहरात दोन मोबाईल स्वॅब तपासणी पथके कार्यान्वित केले आहे. त्यास मान्यता देण्यात आली असून, लवकरच ते पथके कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार याचीही माहिती दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी पत्रपरिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. भारुड म्हणाले, की कोरोनामुळे नागरिक जिल्हा रूग्णालयात जाण्यासाठी घाबरतात. साहजिकच आहे; वाढत्या कोरोना संक्रमणामुळे प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. अनेक नागरिक स्वॅब देण्यासाठी घाबरत आहेत. निर्भय होऊन स्वॅब देण्यासाठी पुढे आले पाहिजे. यासाठी नंदुरबार शहरासाठी २ तपासणी पथके कार्यान्वित करीत आहोत. ते पथके शहरातच स्वॅब घेतील. येत्या दोन दिवसात कार्यान्वित करण्यात येणार आहे. मोबाईल पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ठरवून दिलेल्या वेळेत नगरपालिकेच्या शाळेत किंवा एखाद्या रुग्णालयात मोबाईल पथक कर्मचारी नागरिकांचे स्वॅब घेतील. 

एकाच वेळी बाराशे अहवाल
त्‍याचप्रमाणे ८९ लाखाची आर्टीफिशियल लॅबचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामुळे एकाच वेळेस १२०० स्वॅब अहवाल मिळू शकतील. तसेच ६० लाखाचे स्वॅब तपासणी किटस् मागविण्यात आल्या आहेत. तर ३० हजार रुपये किंमत असलेल्या टॉसिझ्यूमॅब शंभर इंजेक्शनची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी अनेक वितरकांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. 

दीडशे बेड रुग्णालयाचा लवकरच शुभारंभ 
नंदुरबार शहरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने उपचारासाठी आता खासगी डॉक्टरांची प्रशासनाला गरज आहे. डॉक्टर नियुक्तीसाठी तीन वेळेस जाहिराती काढण्यात आल्या होत्या. वेळोवेळी डॉक्टर संघटनांच्या बैठका घेतलेल्या आहेत. घटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. नंदुरबार शहरातील डॉक्टरांच्या व्हाट्सॲप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. त्यात १८० सदस्य आहेत. खासगी रुग्णालयात ताप असलेल्या रुग्णांची डॉक्टरांनी माहिती व्हाट्सॲप ग्रुपवर द्यावी. त्या रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

सध्या उपलब्‍ध साठा
सध्या टॉसिझ्यूमॅब १० इंजेक्शन पैकी ५, रेमडीसीव्हीर ४० इंजेक्शन पैकी ११ तर फेविपिरॅविर १७० इंजेक्शन्स पैकी ३० इंजेक्शनच्या वापर झाला आहे. आतापर्यंत रॅपिड एंटीजन टेस्ट २९६ पैकी ७५ जणांच्या अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२४ ट्रूनेट टेस्ट पैकी ३७ जण पॉझिटिव्ह आले.३ हजार ५६५ पैकी ४०३ जणांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. आतापर्यंत ५१५ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३३० रुग्ण बरे झाले आहेत, असे डॉ. भारूड यांनी सांगितले.

संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar coronavirus testing two mobile swab Squad