नंदुरबार : कोरोना पॉझिटिव्हचा आकडा पोहोचला सव्वादोनशेवर 

कमलेश पटेल
Friday, 10 July 2020

बाधितांचा आकडा २२५ वर गेला आहे. त्यात सर्वाधिक नंदुरबारच्या रूग्णांचा समावेश आहे. तर त्यानंतर शहाद्याचा क्रमांक लागतो. मृत्यूची संख्या दहा झाली आहे. 

नंदुरबार : जिल्ह्याचा कोरोना संसर्गाचा आकडा वाढतच आहे. याची प्रशासनालाही चिंता लागली आहे. आज बाधितांचा आकडा २२५ वर गेला आहे. त्यात सर्वाधिक नंदुरबारच्या रूग्णांचा समावेश आहे. तर त्यानंतर शहाद्याचा क्रमांक लागतो. मृत्यूची संख्या दहा झाली आहे. 
नंदुरबार शहरातील कल्याणी पार्क येथील ३३ वर्षीय पुरुषाचा स्वॅब अहवाल आज प्राप्त झाला. तो पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने त्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.तो परिसरत कटेंन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. 

शहाद्यात पाच पॉझिटिव्ह 
शहादा : शहरातील श्रीराम कॉलनीतील पिता-पुत्र,तसेच सदाशिव नगरमधील महिला व अन्य कॉलनीतील एक महिला शिवाय तालुक्यातील तोरखेडा येथील एक महिला असे पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्ण राहात असलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.पाच बाधितांपैकी पिता -पुत्र असलेले दोघांवर नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान नाशिक येथील खाजगी रुग्णालयात शहरातील अन्य एक जण उपचारासाठी दाखल झाला असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली. हा व्यक्ती राहत असलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येऊन त्याच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारणटाईन करण्यात आले आहे. 
श्रीराम कॉलनी प्रशासनाने सील करताना कंटेनमेंट झोन व व बफर झोन घोषित केले आहेत. श्रीराम कॉलनी व त्रिमूर्ती क्लासेस परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे. तर कल्पना नगर, वृंदावन नगर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, मोहिदा रोड ,ब्रह्म सुष्टी कॉलनी, मेमन कॉलनी, विकास कॉलनी, स्टेट बँक चौक परिसर, नवीन पीपल बँक परिसर बफर झोनमध्ये घेण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाने श्रीराम कॉलनी परिसरात औषध फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. 

नवापूरात पुन्हा एक 
नवापूर : नवापूरात सहा दिवसात तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. काल रात्री राजीव नगर परिसरात एक ७२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ते सुरत येथे उपचार घेत होते.शहरात भीतीमय वातावरण आहे. राजीव नगर आईस फॅक्टरी जवळील परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील केला आहे.बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. परिसर निर्जंतुकीकरण केला आहे.नवापूरात सहा दिवसात कोरोनाचे तीन रूग्ण आढळून आले. शहरात कोरोनाचा वेग वाढत आहे. नागरिकांनी घाबरू नये,काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने सुरत येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना डिस्चार्ज दिल्याने ते घरी आले. घरी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने तपासणीसाठी त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. तेथून ते सुरत येथे उपचारासाठी गेले असता, त्यांचा अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आला. या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली गेली. परिचारिकांनी घरोघरी जाऊन थर्मल स्कॅनिंग केले.अशी माहिती तहसीलदार सुनीता ज-हाड यांनी दिली आहे. 

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar coronavirus update total two hundred cross