esakal | शेतकऱ्यांवर संकटांचे ढग गडद 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

शेतकऱ्यांना दुबार पेरणी करून खरीप पिके घ्यावी लागली. सध्या पिके परिपक्व झाली आहेत. मात्र पाऊस धीर धरायला तयार नाही. दररोज पावसाची हजेरी सुरू आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी, मकासह अनेक पिके धोक्यात आली आहेत. मूग, उडीद शेतातच वाया गेली. यामुळे शेतकऱ्यांवर संकटांचे ढग अधिक गडद झाले आहे. 

शेतकऱ्यांवर संकटांचे ढग गडद 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : पाऊस उशिरा सुरू झाला, असला तरी वेळोवेळी होणाऱ्या पावसामुळे खरीप पिके जोरदार बहरली आहेत. एकीकडे पावसाचा आनंद शेतकऱ्यांच्‍या चेहऱ्यावर असला तरी दुसरीकडे वादळामुळे पिकांचे होणारे नुकसानही तेवढेच दुःखदायक असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करून खरीप पिके घ्यावी लागली. सध्या पिके परिपक्व झाली आहेत. मात्र पाऊस धीर धरायला तयार नाही. दररोज पावसाची हजेरी सुरू आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी, मकासह अनेक पिके धोक्यात आली आहेत. मूग, उडीद शेतातच वाया गेली. यामुळे शेतकऱ्यांवर संकटांचे ढग अधिक गडद झाले आहे. 

गतवर्षी मुसळधार पावसामुळे हाता तोंडाला आलेल्या घास पावसाने हिरावला होता. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. हजारो एकर क्षेत्रावरील पिके पावसाने शेतातच कुजले होते. त्यामुळे शेतकरी पुरता हताश झाला होता. शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले, नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र ती तोंडाला पाणी पुसल्यासारखीच. त्या संकटाला तोंड देत मागील रब्बी हंगामाने शेतकऱ्यांना तारले. बऱ्यापैकी रब्बीचे उत्पादन आल्याने शेतकऱ्यांचा जिवात जीव आला होता. 
यंदा जिल्ह्यात तळोदा-शहादा तालुक्यात वेळेवर पावसाला सुरुवात झाली. मात्र वादळ वाऱ्याने केळी, पपई, उसाचे मोठे नुकसान केले. अनेक हेक्टर क्षेत्र जमीनदोस्त केले. ऑगस्‍ट महिन्यात नंदुरबार, नवापूर, धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तो आजही कायम आहे. या पावसामुळे मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, मिरची आदी पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली. पिके चांगली जोमात आली. मात्र सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके पिवळी पडली, काही ठिकाणी कुजली व मररोगाचा प्रादुर्भाव झाला. अनेक ठिकाणी पाण्याचा लोट फिरल्याने दुबार पेरणी करावी लागली. आता आहे त्यात पिके जोमात आहे. ते परिपक्व झाले आहेत. त्यातच संततधार पावसाने मूग, उडिदचे पीक नष्ट केले. आता इतर पिके काढणीची वेळ आहे. मात्र पाऊस थांबायलाच तयार नाही. ज्वारी, बाजरी, मका काळी पडू लागली आहे. दररोज पावसाची जोरदार हजेरी सुरूच आहे. शेतकऱ्यांना पाऊस थांबून पिके काढण्याची प्रतीक्षा आहे. मात्र पाऊस थांबत नसल्याने तयार पिके पुन्हा मागील वर्षासारखे कोंब काढतील की काय? अशी भिती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. 

सुरुवातीची पेरणी केली, मात्र पावसाने ताण दिल्याने ते उगवले नाही. पुन्हा उशिरा पेरणी केली. ते उगविले.मात्र त्याची मशागत करण्यास पावसाने सवड दिली नाही. पिके जोमात आली. पिके परिपक्व झाले, मात्र पाऊस थांबत नसल्याने ते शेतातच कोंब काढतील की काय? अशी भिती वाटू लागली आहे. 
-महेंद्र पाटील, शेतकरी , नंदुरबार 


पावसाची आकडेवारी 
नंदुरबार - ८३५ मिमी 
नवापूर- ८०१.३३ 
तळोदा- ९५२ 
शहादा - ७५५ 
अक्कलकगुवा -१०७४ 
धडगाव - ८३३ मि.मी 

सरासरी १०२.१५ टक्के 


संपादन ः राजेश सोनवणे