दशामाता... कोरोनारूपी संकट जाऊ दे... !

धनराज माळी
Tuesday, 21 July 2020

दशामाता उत्सव लगतच्या गुजरातमधील प्रमुख उत्सवांपैकी एक आहे. नंदुरबार जिल्हा गुजरात सीमेला लागून असल्याने १५ ते २० वर्षांपासून दशामाता उत्सव जिल्ह्यात साजरा केला जात आहे.

नंदुरबार ः नवसाला पावणारी देवी म्हणजे दशामाता, अशी श्रद्धा असलेल्या दशामातेच्या उत्सवाला सोमवार (२०) पासून प्रारंभ झाला. उत्सवावर कोरोना महामारीची छाया जरी असली, तरी भाविकांनी घरगुती वातावरणात कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत घरी मूर्तीची विधिवत पूजाअर्चा करून प्रतिष्ठापना केली. 

दशामाता उत्सव लगतच्या गुजरातमधील प्रमुख उत्सवांपैकी एक आहे. नंदुरबार जिल्हा गुजरात सीमेला लागून असल्याने १५ ते २० वर्षांपासून दशामाता उत्सव जिल्ह्यात साजरा केला जात आहे. आषाढी दीप अमावस्येपासून दहा दिवसांपर्यंत सर्वत्र दशामातेचा उत्सव असतो. गणेशोत्सवासारखेच स्वरूप असते. यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या उत्सवालाही नियमांचे बंधन आले. दर वर्षी मूर्तिकाराकडून मूर्ती घेऊन जाण्यासाठी जो ढोल-ताशांचा गजर, नाचणाऱ्यांचा उत्साह असतो तो या वेळेस मात्र दिसून आला नाही. 
भाविकांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कारागिराकडे जाऊन विविध वाहनांद्वारे, तर काहींनी पायी जात मूर्ती घरी आणत जल्लोषात स्वागत केले. महिला भाविकांनी मातेच्या मूर्तीला आकर्षकरीत्या दागदागिने घालून सजावट केली. मंगळ बाजार, अहिल्याबाई विहीर परिसरात विक्रेत्यांनी पूजासाहित्याचे स्टॉल लावले होते. 

रासदांडिया नाही 
दशामाता उत्सव दहा दिवस चालणार असल्याने महिला व युवतींमध्ये उत्साह संचारलेला असतो. मातेची सकाळ-सायंकाळी आरती होते. त्या वेळी भाविक महिला रासदांडिया खेळत असतात. उत्सवकाळात दहा दिवसांचा उपवास अनेक महिला व युवतींकडून करण्यात येतो. यंदा मिरवणूक न काढता महिलांनी फुगड्या खेळत जयजयकार करीत मातेची मूर्ती आणून जोरदार स्वागत केले. त्यानंतर पूजाविधी करीत प्रतिष्ठापना केली. मात्र सायंकाळचा रासदांडिया रंगणार नाही म्हणून महिला व युवतींमध्ये नाराजीचे सूर दिसून आले. 

मूर्तिकारांनाही फटका 
रविवारी कडकडीत संचारबंदी लावण्यात आल्याने सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे भक्तांनी दोन दिवसांपूर्वी, तर काहींनी सोमवारी (ता. २०) मूर्ती खरेदी केली. शहरातील स्टेशन रोड, अहिल्याबाई विहीर परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. २०० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतच्या मूर्तींची विक्री झाली. या वर्षी कोरोना महामारीमुळे विक्रीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. दर वर्षी मूर्ती विक्रीतून चांगली उलाढाल होते. यंदा अनेक भाविकांनी घरी स्थापना करण्याचेही टाळले. अनेकांनी लहान मूर्ती खरेदीस प्राधान्य दिले. त्यामुळे मूर्तिकारांकडे मोठ्या मूर्ती पडून राहिल्याचे चित्र आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar dashamata festival Celebration but corona Crisis