रूग्णालय इमारतीत चालतात अवैध धंदे

विजय वळवी
Friday, 28 February 2020

इमारतीचा वापर का होऊन शकला नाही याचे उत्तर मात्र आरोग्य आणि बांधकाम विभागाकडे नाही. शासनाच्या निधीचा मोठा अपव्यय झालेला आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन लक्ष देणार का ? असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे. 

धानोरा : देवपूर (नटावद) ता. नंदुरबार) येथे ग्रामीण रुग्णालयाची इमारतीचे बांधकाम होऊन आठ वर्षे होऊनही या इमारतीत ना दवाखाना सुरू झाला ना तिचे उद्घाटन अन वापर झाला. आरोग्य विभागाकडे हस्तातंतरित झालेली ही इमारत आता दारूडे, चोरटे यांचा अड्डा बनली आहे. अनेक अनैतिक व्यवहारही तिथे होत असल्याचे समजते. कोट्यवधी रूपये खर्चून ही इमारतीचा वापर का होऊन शकला नाही याचे उत्तर मात्र आरोग्य आणि बांधकाम विभागाकडे नाही. शासनाच्या निधीचा मोठा अपव्यय झालेला आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन लक्ष देणार का ? असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे. 
नटावद येथील ग्रामीण रूग्णालयासाठी या इमारतीचे काम २०१२-१३ मध्ये पूर्ण झाले, या कामासाठी सुमारे चार कोटींचा निधी मंजूर झाला होता. इमारतीचे काम पूर्ण होऊन आता तेथे आदिवासींसाठी चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळेल अशी जनतेची पेक्षा होती. या रूग्णालयासाठी आवश्‍यक कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे, मात्र ते सध्या जिल्हा रूग्णालयात काम करत आहेत. 

इमारतीची दुरवस्था 
गेल्या आठ वर्षांपासून केवळ उभ्या असलेल्या या इमारतीची दुरवस्था होत चालली आहे. खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. लोखंडी ग्रीलची चोरी झालेली आहे. इमारतीला साधे कुलूपही नसल्याने कुणीही येत-जात असतो. तेथे दिवसा पत्ते जुगाराचे अड्डे चालतात. काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार तर ही इमारत आता अनैतिक धंद्यांचा अड्डाच बनली आहे. त्यामुळे इमारतीवर झालेला खर्च वाया गेल्यात जमा आहे. 

जनता पाहतेय वाट... 
नटावदपासून एक किलोमीटवरवर देवपूरच्या हद्दीत ही इमारत आहे. तेथून धानोरा ग्रामीण रूग्णालया चार किलोमीटरवर आहे. देवपूरला प्राथमिक आरोग्य केंद्र एक किलोमीटरवर आहे. परिसरातील पंचविस ते तिस गावातील लोकांसाठी उपयुक्त ठरू शकणारे हे ग्रामीण रूग्णालय आता कधी सुरू होईल याची जनता वाट पहात आहे. 

उद्घाटन का रखडले ? 
इमारतीचे बांधकाम २०१२-१३ मध्ये पूर्ण करण्यात आले. परंतू इमारतीचे उद्‌घाटन आजपर्यत होऊ शकलेले नाही. या काळात तिची काळजीही घेतली न गेल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे. हे रुग्णालय २७ खाटांचे असून पूर्ण सोयीसुविधांनी तयार झालेले आहे. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने देखील तयार असून पाण्याची सोयही आहे. असे असताना तिचे उद्घाटन आणि वापर होऊ शकलेला नाही हे येथील आदिवासी जनतेचे दुर्देव आहे. केवळ निधी खर्च व्हावा म्हणून तर ही इमारत उभी केलेली नाही ना अशा शंका व्यक्त होत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar dhanora rural hospital jugar adda