esakal | नंदुरबार : १९ लाख नागरिकांचे घरोघरी सर्वेक्षण 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus testing

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी शासनस्तरावरून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना, मोहीम कालावधीत प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी वापरावयाचे मोबाईल ॲप बाबत मार्गदर्शन केले.

नंदुरबार : १९ लाख नागरिकांचे घरोघरी सर्वेक्षण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्हास्तरावर १५ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ही मोहीम राबविण्याबाबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तसेच तालुका आशा समूह संघटकाचे प्रशिक्षण घेण्यात आले. सुमारे १९ लाख नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी शासनस्तरावरून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना, मोहीम कालावधीत प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी वापरावयाचे मोबाईल ॲप बाबत मार्गदर्शन केले. मोहीम कालावधीत मनुष्यबळ व साधन सामग्रीच्या कृती आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १८ लाख ९१ हजार ७२६ लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी एका पथकात तीन सदस्य असे एकूण २ हजार ५२२ कर्मचाऱ्याची नेमणूक यासाठी करण्यात आली आहे. 

अतिजोखमीच्या व्यक्तींचे प्रथम सर्वेक्षण करा 
या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका आणि दोन सहकारी एका पथकात असतील. २५ दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी दरदिवशी ५० घरांचे एका पथकाने सर्वेक्षण करावयाचे आहे. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरात जाऊन कोरोनाची लक्षणे असलेले व्यक्ती आदींची माहिती घेण्यात यावी. एखाद्या व्यक्तीत लक्षणे आढळल्यास तात्काळ स्वॅब चाचणी मोबाईल टीमद्वारे करून घ्यावी. बाधितांची अधिक संख्या असलेल्या गावात अधिकाधिक स्वॅब चाचणी होण्यासाठी संपर्क अधिकारी नेमावे. अशा गावातील अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. या मोहिमेमुळे कोरोना संपर्क साखळी खंडीत करण्यात मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.