नंदुरबारने करून दाखविले...बारा दिवसांचा खेळ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

अखेरचे २ कोविड रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर एकही कोरोनाबाधित रूग्ण उरला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. नवीन कोणतेही संसर्गित रूग्ण आढळून आलेले नाहीत. 

नंदुरबार : जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर उर्वरित १९ रुग्णांवर आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करून उपचार करीत होते. ६ ते आज १८ मे अखेर १२ दिवसात सर्वच १९ रूग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. आज तळोदा तालुक्यातील बोरद येथील ६८ वर्षीय महिला व नटावद येथील ३१ वर्षीय पुरुष असे अखेरचे २ कोविड रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर एकही कोरोनाबाधित रूग्ण उरला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. नवीन कोणतेही संसर्गित रूग्ण आढळून आलेले नाहीत. 

२२ मार्चला लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्पापर्यंत जिल्हा प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक परिस्थिती हाताळत होते. मात्र १७ एप्रिलला शहरातील ४८ वर्षीय पुरूषाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न होऊन त्याचा अहवाल पॉझिटिव्ह त्यानंतर २०एप्रिलला त्यांच्या कुटुंबीयांमधील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.२२ एप्रिलला अक्कलकुवा येथील ३२ वर्षीय महिला ,शहादा येथील ४५ वर्षीय महिला व ३२ वर्षीय तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संख्या सातवर गेली होती. त्या दिवशीच ३२ वर्षीय तरूणाचा रूग्णालयात मृत्यू झाला होता. पुन्हा २४ एप्रिलला शहाद्यातील २३ वर्षीय तरूण २५ एप्रिलला पुन्हा अक्कलकुवा येथील दोन महिला शहादा येथील एक पुरूष पॉझिटिव्ह निघाले.२८ एप्रिल अक्कलकुवा येथील पुरूष व शहाद्यातील १५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.२८ एप्रिलला शहादा येथील चार जणांना संसर्ग निष्पन्न झाला. १ मेस एका पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.तर ३ मेस नटावद येथील ३१ वर्षीय तरूण, ७ मेस बोरद येथील ६८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिट्विह आला. ८ मेस ८० वर्षीय महिलेचा खासगी रूग्णालयात संसर्गाने मृत्यू झाला. असे एकूण २१ रूग्ण संसर्गित होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता. 

बारा दिवसात खेळ खल्लास
१९ रूग्णांवर आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न करीत औषधोपाचर केल्याने पहिले चारही रूग्ण ६ मेस बरे होऊन घरी परतले होते. त्यानंतर ७ मेस शहाद्याची महिला , १५ मेस पुन्हा ६ रूग्ण बरे होऊन घरी परतले. १६ मेस ६५ वर्षीय पुरूष बरे होऊन घरी परतले होते. तर काल (ता.१७) पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आज शेवटचे दोन रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात एकही नवीन कोरोना संसर्गित रूग्ण नाही. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनीदेखील सर्व रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने समाधान व्यक्त केले.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, डॉ. के.डी. सातपुते ,डॉ. पंकज चौधरी, अधिपरिचारिका नामी गावीत, पौर्णिमा भोसले, मंजुषा मावची, टिना वळवी, कक्षसेवक उदय परदेशी, अक्रम शेख आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. 

संसर्गमुक्त होणे ही जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि परिचारिकांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांनी रुग्णांवर उपचार करण्याबरोबर त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे प्रयत्न केले. जनतेचे चांगले सहकार्य लाभले. पोलीस, महसूल, ग्रामपंचायत, नगरपालिका अशा सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. आपल्या राज्यातून आणि देशातून अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त होईपर्यंत आपल्याला दक्षता घ्यायची आहे. 
- पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी 

नागरिकांनी खबरदारी घ्यावी. शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करावे व अनावश्यक गर्दी टाळावी. शहरातील व्यवहार सुरळीत करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असून नागरिकांनी त्यास सहकार्य करावे आणि या संकटापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व करोना योद्ध्यांविषयी सन्मानाची भावना 
मनात बाळगावी. 
डॉ. राजेंद्र भारूड ,जिल्हाधिकारी,नंदुरबार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district corona green zone