कोरोना’साठी कर्मचाऱ्यांची भरतीची फाइल अडली कुठे? 

धनराज माळी
Saturday, 27 June 2020

कोरोना’शी दोन हात करत चार महिने निघून गेले. तेच व तेवढेच कर्मचारी ‘कोरोना’शी लढताहेत. आरोग्य विभागावर पहिलेच कामाचा भार अधिक आहे. कर्मचारी संख्या कमी आहे, तरीही जिल्हा आरोग्य विभागाने आपला लढा अपूर्ण सोडलेला नाही.

नंदुरबार : ‘कोरोना’ने उग्र रूप धारण केले आहे. त्याने रुग्णांवर उपचार करणाऱ्या ‘कोरोना योद्ध्यां’नाच घायाळ करणे सुरू केले आहे. कमी मनुष्यबळ असताना आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करून ‘कोरोना’शी लढताहेत. मात्र, तरीही जिल्हा प्रशासनाने ‘कोरोना’साठी स्वतंत्र आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागावर ताण येत असूनही रिक्त पदे भरली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. 
‘कोरोना’शी दोन हात करत चार महिने निघून गेले. तेच व तेवढेच कर्मचारी ‘कोरोना’शी लढताहेत. आरोग्य विभागावर पहिलेच कामाचा भार अधिक आहे. कर्मचारी संख्या कमी आहे, तरीही जिल्हा आरोग्य विभागाने आपला लढा अपूर्ण सोडलेला नाही. आहे त्या परिस्थितीत डॉक्टर असो की त्यांचे सहकारी कर्मचारी; सर्वचजण तन- मनाने काम करीत आहेत. त्यासाठी स्वतः धोका पत्करत आहेत. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून साधी शाबासकीची पाठीवर थापही मिळत नाही. तरीही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आरोग्य विभाग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, डॉ. सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली लढत आहे. 

‘कोरोना’बाधित रुग्णांवर योग्य उपचार करीत आतापर्यंत ५२ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत त्यांना ‘कोरोना’मुक्त केले. असे असताना दिवसेंदिवस ‘कोरोना’ संसर्गाची संख्या वाढत आहे; त्यासोबतच कामाचा भार वाढत आहे. तरीही आरोग्य कर्मचारी मुकाट्याने काम करीतच आहेत. असे असताना वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, ‘कोरोना’साठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी भरण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार करून पाठविल्यास त्याला जिल्हाधिकारी मंजुरी देऊ शकतात. मात्र, अद्याप ‘कोरोना’साठी स्वतंत्र आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली गेली नाही. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना आतातरी कर्मचारी भरती करावी, असा सूर आरोग्य कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे. 

डॉक्टर- कर्मचाऱ्यांना संसर्ग 
आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील ४०४ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी (स्वॅब) करावी लागली आहे. अनेक कर्मचारी बाधित झाले. सुदैवाने ते बरेही झाले. पुन्हा रुग्णसेवेत कार्यरतही आहेत. गुरुवारी (२५ जून) एकाच दिवशी ३८ रुग्ण बाधित निघाले. त्यात रुग्णालयात उपचार करणाऱ्या दोन डॉक्टरांनाही ‘कोरोना’ने सोडलेले नाही. त्यामुळे एकीकडे उपचार करताना बाधित होणारे डॉक्टर व कर्मचारी क्वारंटाइन होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या आपसूकच कमी होते. त्यामुळे उपचार करण्यासाठी तारांबळ उडत आहे. 

जिल्हाधिकारी लक्ष देतील काय? 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोना’साठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी जिल्हा रुग्णालयाकडून झाली आहे. तशा प्रस्तावाची फाइल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. मात्र, त्या फाइलवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ती फाइल अडली कुठे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जर अत्यंत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी असताना फाइल मंजुरीसाठी उशीर का, हाही प्रश्‍न अनुत्तरित आहे. त्यामुळे जर तसे असेल, फाइल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडली असेल, तर त्याकडे जिल्हाधिकारी डॉ. भारूड लक्ष देतील का, कर्मचारी भरतीस मंजुरी मिळेल का, असे प्रश्‍न आरोग्य कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केले जात आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district corona new staff apoined file close