निवडणूक कामात नंदुरबार जिल्हा विभागात सर्वोत्कृष्ट 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चांगले काम झाल्याची नोंद निवडणूक आयोगाकडे झाली आहे. त्याची दखल घेवून निवडणूक आयोगाने हा पुरस्कार जाहीर केला आहे.

नंदुरबार : विधानसभा निवडणुकीत निर्भय, मुक्त व पारदर्शी वातावरणात निवडणुका पार पाडून सर्वाधिक मतदानासाठी जनजागृती केल्याने नंदुरबार जिल्ह्यातून ७३.७ टक्के सर्वाधिक मतदान झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य निवडणूक आयोगातर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे. नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चांगले काम झाल्याची नोंद निवडणूक आयोगाकडे झाली आहे. त्याची दखल घेवून निवडणूक आयोगाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. त्याबाबतचे पत्र आज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. 

निवडणुकीचे काम आणि वाढलेली मतदानाची टक्केवारी हे सांघिक यश आहे. याबद्दल मी सर्वप्रथम जिल्ह्यातील जनतेचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच आज जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे. अजून अनेक प्रकल्प आहेत, ते पूर्ण करायचे आहेत, सगळ्यांनी त्यासाठी योगदान द्यावे. 
- डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी, नंदुरबार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district election work devision first