ऑगस्ट संपला तरी पीककर्जाची बोंबाबोब 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकरींना वेळेवर पीककर्ज उपलब्ध न करुन देण्याच्या भुमिकेमुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे. सद्या परिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला वेठीस धरले आहे.

नंदुरबार : जिल्ह्यात पीककर्जासाठी शेतकऱ्यांना अजूनही बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. कोरोनाचे कारण सांगत अधिकारी चालढकल करत आहेत. जिल्हा प्रशासनही याप्रश्नी कडक भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरींच्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. तसे निवेदन जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. 
निवेदनात म्हटले आहे, की राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकरींना वेळेवर पीककर्ज उपलब्ध न करुन देण्याच्या भुमिकेमुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे. सद्या परिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. कर्ज वाटपाच्या योजनेला एकप्रकारे केराची टोपली दाखवून राष्ट्रीयकृत बँकांनी मनमानी चालविली आहे. पीककर्ज जुलैअखेर मिळणे अपेक्षित होते. परंतु कोरोनाचे कारण पुढे करुन बहुतेक बँक अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला. जुलै महिन्यातच शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न करणाऱ्या बँकांवर फौजदारी खटले दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले होते. परंतु त्याची कुठलीही अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात होताना दिसत नाही. ऑगस्ट संपला तरी बहुतांश शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नाही. सतत पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे नगदी पिकांची स्थिती वाईट झाली आहे. कपाशी व मिरचीची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पावसामुळे पिकांचे पंचनामे त्वरित सुरु करावेत, पीक विमा मिळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत. शेतकऱ्यांच्या समस्येविषयी प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district farmer not distribute loan