
जुलैमध्येही समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलैअखेर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पाऊस नियमितपणे येईल या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली.
नंदुरबार जिल्ह्यात ११ हजार ८८६ शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत समावेश
तळोदा : यंदाच्या खरिपात तालुक्यातील केवळ २०२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा (Prime Minister's Crop Insurance Scheme) घेतला असून, जिल्ह्यातून मात्र ११ हजार ८८६ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यातून जिल्ह्यातील १२ हजार १९३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. त्यात जिल्ह्यात पावसाच्या कालावधीत खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटल्याने जिल्हा प्रशासनाने नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यात सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आता पुन्हा ३० तारीख उजाडूनही जिल्ह्यात पावसाचा मागमूस दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या (Farmers) तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा: धुळे जिल्ह्यात पावसाने मारली दडी..शेतीचे प्रचंड नुकसान
यंदाच्या खरिपात सुरवातीपासूनच शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृग नक्षत्राने पाठ फिरविल्यापासून जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन उशिरानेच झाले. त्यातही संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलैमध्येही समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलैअखेर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पाऊस नियमितपणे येईल या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्यात मूग, उडीद, कापूस, मका, भात, तूर, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, बाजरी अशा खरिपाच्या पिकांची पेरणी झाली. मात्र पिकांची वाढ होण्याच्या कालावधीत पुन्हा पावसाने ओढ दिली. त्यातून अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली, असे असले तरी खरिपाच्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ती जिवापाड जपली आहे.
त्यात जिल्हा कृषी कार्यालयाने नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यांतील कापूस, सोयाबीन व भात या अधिसूचित पिकांची नजरअंदाजाने एकूण पेरणी क्षेत्रापैकी पाच टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, विमा कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधींनी केले आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यातून पाऊस केव्हा होणार, याचीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
हेही वाचा: दीड महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही
पीकपद्धतीत बदलाची गरज
तळोदा तालुक्यात बागायती शेती कूपनलिकेच्या अर्थात, भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. त्यात एक पीक पद्धतीने शेती मोठ्या प्रमाणात होत असल्याने व भूगर्भातील पाणी देण्याची सोय असल्याने खरीप हंगामात पीकविमा योजनेत सहभाग कमी दिसत असल्याचे बोलले जाते. एकीकडे पावसाच्या कालावधीत खंड पडल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. तर दुसरीकडे भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे तालुक्यात भूगर्भातील पातळीचे सर्वेक्षण होऊन शेतकऱ्यांमध्ये पीकपद्धतीत बदल होण्यासाठी जाणीवजागृतीची गरज असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा: ई-पीक पाहणीत जळगाव जिल्हा राज्यात प्रथम
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत तालुकानिहाय सहभागी शेतकरी
नंदुरबार- ६००२
नवापूर-७९५
अक्कलकुवा-६९२
शहादा-१३२३
तळोदा-२०२
अक्राणी-२८७२
एकूण-११८८६
Web Title: Marathi News Nandurbar District Pm Crop Insurance Scheme Eleven Thousand Registrations
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..