
पावसाच्या रिपरिपीने या भागातील मुख्य पीक कापसासह जनावरांचा चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा आस्मानी संकटात सापडला आहे. आतातरी शासन स्तरावरून पंचनामे व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
मंदाणे (नंदुरबार) : उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाची रिपरिप सुरू आहे. मंदाणे (ता. शहादा) व परिसरात देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊन पावसाच्या रिपरिपीने या भागातील मुख्य पीक कापसासह जनावरांचा चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा आस्मानी संकटात सापडला आहे. आतातरी शासन स्तरावरून पंचनामे व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
मंदाणे परिसरातील मुख्य पीक समजले जाणारे कापसासह मका, मिरची, पपई व भाजीपाल्याचे मोठे नुकसान होऊन बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्याचबरोबर अतिवृष्टी व बोंडअळीमुळे कापूस काढून लागवड केलेल्या गहू व हरभऱ्याचे फुलगळ होऊन उत्पादन घटणार आहे. सोबतच शेतात साठवून ठेवलेला चाराही काळा पडून खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीतच बळीराजावर पुन्हा एकदा संकट निर्माण झाले आहे.
आता तरी पंचनामे होतील का?
अतिवृष्टीमुळे, बोंड अळीमुळे सुरुवातीपासूनच कपाशीच्या उत्पन्नात घट झाली. लागलेला खर्च पहाता उत्पन्न खूपच कमी येणार हे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी होऊ लागली. परंतु त्याची दखल शासन स्तरावर आजपर्यंत दखल घेतली नाही. आता दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वेचणीत आलेल्या कापसाचे व चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आतातरी शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
अतिवृष्टीमुळे, बोंड अळीमुळे उत्पादनात प्रचंड घट होऊन कापसाची गुणवत्ता खालावल्याने कमी दर मिळत आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने थोडेफार येणारे उत्पन्न देखील हातचे जाणार आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून शासनाने मदत द्यावी.
-भालेराव साळुंखे, शेतकरी तथा विकासो निवृत्त सचिव, मंदाणे
कापूस पीक काढून त्याऐवजी गेल्या महिन्यात हरभरा, गव्हाची पेरणी केली. परंतु कालपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फुल व फळ गळ होऊ लागली. पुन्हा उत्पादनात घट होईल असे चित्र स्पष्ट झाले आहे. आतातरी शासनाने पंचनाम्याची तयारी दाखवून मदतीचा हात पुढे करावा.
- सचिन पावरा, शेतकरी, तितरी, ता.शहादा
संपादन ः राजेश सोनवणे