
कपाशीच्या बीजांकुरावर किटकुलाचा हल्ला; दुबार पेरणीचे संकट
सारंगखेडा (नंदुरबार) : शेतात शेतकऱ्यांनी बीटी बियाणे (Cotton seeds plantation) लागवड केल्यानंतर जमिनीवर उगवणाऱ्या बीजांकुरावर जमिनीतील किडा असलेल्या किटकुलाने हल्ला चढविला आहे. यामुळे बीजांकुरणालाच कीड लागली असून, सारंगखेडा परिसरात अनेकांच्या शेतात हा प्रकार दिसून आला. किटकुलाने कपाशीचे बीजांकुर फस्त केले असून, शेतकऱ्यांवर (Farmer) कपाशीच्या दुबार पेरणीची वेळ आली आहे. (nandurbar-farmer-Crisis-of-double-sowing-Insect-infestation-on-cotton-seeds)
सारंगखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर क्षेत्रावर केलेली कपाशीची लागवड वाणू या किड्याच्या प्रादुर्भावामुळे वाया गेली आहे. या किड्यांनी रातोरात जमिनीतील बियाणे व जमिनीबाहेर निघणारे अंकुरच नष्ट केल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार लागवडीचे संकट आले आहे. दर वर्षी वाणू हे किडे पावसाळा सुरू झाला, की शेतात दिसायला लागतात. शेतात बियाण्यांची पेरणी झाली, की अंकुरलेले बीज व बियाणे अचानकपणे वाणू कीटक रातोरात तयार होऊन फस्त करून टाकतात. तेव्हाच त्यांचे दर्शन होते. बियाणे पेरणीपर्यंत हे कीटक दृष्टीसही पडत नाहीत; परंतु पीक जसजसे जमिनीवर यायला लागले तेव्हा अचानकपणे या कीटकांचे आगमन होते. त्यावर कीटकनाशक औषधांचा कोणताही परिणाम होत नसल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
दरवर्षी नुकसान उपाय नाहीच
विशेष म्हणजे हा प्रकार दर वर्षी होत आहे. शेतात पेरलेले बियाणे व जमिनीवर आलेले अंकुर नष्ट होत असल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी कृषी विभागाकडे केली आहे. वाणू या कीटकामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याची मागणीही केली आहे.
शेतकरीपुढे संकटच
गेल्या अनेक वर्षांपासून विविध संकटांचा सामना करीत शेतकरी जीवन पडतझडत जगत आहेत. कधी पावसाअभावी, तर कधी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे. कधी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे हातात आलेले पीक आपल्या डोळ्यांदेखत वाया जाताना पाहिल्याचे कटू अनुभवही शेतकऱ्यांच्या गाठी आहेत. यंदाही शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरवातीलाच आणखी नवीन संकटांचा सामना करावा लागत आहे.