दरवर्षी जेवणाला वेळ नाही अन्‌ रात्रीचा दिवस व्हायचा पण आता...मुर्तीकाराची व्यथा

धनराज माळी
Saturday, 8 August 2020

तीन महिन्याअगोदरच रांत्रदिवस एक करून मुर्ती घडवायचो, तरीही कमी पडायच्या,यावर्षी कोरोनामुळे तीस दिवसही पुरेसे मिळणे अवघड झाले, त्यातच नियमांचे बंधन पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे संघर्षच संघर्ष आहे.

नंदुरबार : कोरोना महामारीने होत्याचे नव्हते करून सोडले, दरवर्षी जेवणासाठीही वेळ नसायचा ,एवढे व्यस्त असायचो, तीन महिन्याअगोदरच रांत्रदिवस एक करून मुर्ती घडवायचो, तरीही कमी पडायच्या,यावर्षी कोरोनामुळे तीस दिवसही पुरेसे मिळणे अवघड झाले, त्यातच नियमांचे बंधन पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे संघर्षच संघर्ष आहे. असो, परंतु या परिस्थितीने संघर्षात जगण्याची शिकवण दिली. असे मत गणेश मुर्तीकार दर्शन सोनार यांनी व्यक्त केली आहे. 

विघ्नहर्ताच्या उत्सवावरच कोरोनाचे विघ्न 
विघ्नहर्ता गणरायाचे आगमन १५ दिवसांवर आले. पर्यावरणपूरक व शास्त्रोक्त पद्धतीने शाडू मातीचे सुबक आणि देखण्या गणेश मूर्ती येथील मूर्तिकार दर्शन सोनार साकारत आहेत. यंदाचा कोरोना संघर्ष व व्यवसाय याबाबत श्री. सोनार यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले, यावर्षी मार्चपासून कोरोना महामारीमुळे प्रत्येकाला संघर्षातून मार्ग काढीत जगण्याची शिकवण मिळाली. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न आहे. त्यामुळे कमी प्रमाणात घरगुती स्वरूपातील गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. 

पर्यावरणपूरक मुर्ती 
गेल्या सहा वर्षापासून शाडू मातीचे पर्यावरण पूरक गणेशमूर्ती साकारत आहेत. लहानपणी शालेय जीवनापासून अस्सल मातीतून तयार होणाऱ्या दादा गणपतीची मूर्ती पाहिल्यानंतर गणपती बनवण्याचा छंद जोपासला. २०१४ पासून कुठलेही प्रशिक्षण न घेता एक ते चार फुटापर्यंतचे आकर्षक शाडू मातीचे गणपती बनविण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून आजतागायत असंख्य गणेश भक्तांनी शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले जाते.यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सवावर गडद सावट पसरले आहे. 

शासन आदेशाचे पालन 
शासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार घरगुती स्वरूपातील दोन आणि सार्वजनिक गणेश मंडळासाठी चार फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर पर्यावरणाला बाधा पोहोचवणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी पारंपरिक पद्धतीच्या शाडू माती मूर्तींना प्राधान्य देण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे मूर्ती कलावंतांसह समाजातील प्रत्येक घटकावर परिणाम झाला आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या चार महिनेआधी मूर्ती बनविण्यास प्रारंभ होत असतो. यंदा मात्र लॉकडाऊन मुळे वाहतूक व्यवस्था आणि दळणवळण बंद असल्यामुळे बाहेर गावाहून कच्चामाल आणणे अवघड झाले होते. जुलै महिन्यात काहीअंशी वाहतूक सुरू झाल्यामुळे कच्चा माल प्राप्त झाल्यानंतर शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यास प्रारंभ केला. 
 
गणेश मूर्ती बनविण्यासाठी आई, वडील, आणि भाऊ मदत करीत असतात. राज्य शासनातर्फे मूर्तिकार कलावंतांना प्रोत्साहनपर योजना जाहीर करण्याची गरज आहे.गणेशोत्सवा व्यतिरिक्त काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इतर कामे करतो,यावर्षी मार्चपासून कोरोना महामारीमुळे प्रत्येकाला संघर्षातून मार्ग काढीत जगण्याची शिकवण मिळाली. विघ्नहर्ता गणराया कोरोनाचे संकट जगातून लवकर नष्ट कर. 

- दर्शन सोनार, मूर्तिकार 
 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar ganesh festival Of the sculptor ganesh murti