esakal | नैसर्गिक उतारानुसार नदीजोड प्रकल्प राबविल्यास खानदेश सुजलाम -सुफलाम होईल !
sakal

बोलून बातमी शोधा

नैसर्गिक उतारानुसार नदीजोड प्रकल्प राबविल्यास खानदेश सुजलाम -सुफलाम होईल !

नदीचा प्रवाह इकडून तिकडे वळवून तो जोडण्याचा नादात खचर्ही वाढतो व ती योजना यशस्वी होत नाही. त्यामुळे नॅचरल नदी जोड प्रकल्प झाले पाहिजे.

नैसर्गिक उतारानुसार नदीजोड प्रकल्प राबविल्यास खानदेश सुजलाम -सुफलाम होईल !

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार  ः उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र जलसिंचन महामंडळाचे प्रस्ताव केंद्र व राज्य शासनाकडे जलपरिषदेने सादर केले आहेत. ही अत्यंत महत्वाची व खानदेशातील जनतेसाठी कल्याणकारी ठरणारी योजना असेल, मात्र नॅचरल (नदीच्या नैसर्गिक उतारानुसार) नदीजोड प्रकल्प राबविले पाहिजे. तसे झाल्यास खानदेश सुजलाम -सुफलाम होईल, असे तापी खोरे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. 

जल परिषदेने केंद्र व राज्य शासनाकडे सादर केलेल्या स्वतंत्र उत्तर महाराष्ट्र सिंचन महामंडळाचा प्रस्तावासंदर्भात तापी खोरे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार व शिवसेना चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी श्री. रघुवंशी बोलत होते.‘सकाळ' ने आज प्रसिध्द केलेल्या ‘उत्तर महाराष्टसाठी स्वतंत्र जलसिंचन महामंडळ हवे‘ या वृत्ताचे स्वागत करीत उत्तर महाराष्ट’साठी नव्हे तर खानदेशसाठी स्वतंत्र जलसिंचन महामंडळ हवे अशी भूमिका त्यांनी मांडली. 

श्री. रघुवंशी म्हणाले,‘ शासनाने लिफ्टमध्ये मोठा खर्च करूनही त्या बंद पडल्या आहेत. त्यांचे मेटेंनन्स व वीज बिल खर्चही शासनाला न परवडणारा आहे. कोणत्याही रिजनल वॉटर योजना यशस्वी होत नाहीत. नदीचा प्रवाह इकडून तिकडे वळवून तो जोडण्याचा नादात खचर्ही वाढतो व ती योजना यशस्वी होत नाही. त्यामुळे नॅचरल नदी जोड प्रकल्प झाले पाहिजे.

खानदेशातील साऱ्याच नदी -नाल्यांचे पाणी शेवटी तापीला जाऊन मिळते. त्यामुळे तापीजोड प्रकल्पच खानदेशसाठी म्हटले तरी चालेल. नदीचा प्रवाह वळविण्यापेक्षा त्या नद्यांचा उतार (स्लोप) व तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून एखादे गाव किंवा एखादा तालुका सुटत असेल तरी चालेल. तेथे नंतर पाणी पोहोचविता येऊ शकते. मात्र नॅचरलमुळे पाणी योग्य दिशेने जाते. त्यासाठी कोणतेही इस्टीमेट बनविण्याची गरज नाही. खर्च कमी लागेल. देखभाल व वीज बिलाचा खर्च लागणार नाही. अन्यथा उपसा सिंचनासारखे होईल. बुराईचा खर्च जिल्हा परिषद व नगर पालिकेला न परवडणारा आहे. बोगदा पाडण्याचा भानगडीत पडू नये, नैसर्गिक उतारानुसार नदी जोडली गेली पाहिजे. मध्ये प्रदेश शासनाने ते यशस्वी केले आहे. खानदेशातील काही नद्या तापी खोऱ्यात येतात. कमी खर्चात व पेलवेल अशा पद्धतीने काम झाल्यास खानदेश सुजलाम -सुफलाम होईल. 

उत्तर महाराष्ट्र नव्हे, केवळ खानदेश हवे - रघुवंशी 
नाशिक व नगर जिल्हे सधन आहेत. तेथे खूपच सिंचनाच्या सुविधा आहेत. त्यातच त्यांचा थेट मराठवाड्यापर्यंतत संबंध येतो. त्यात त्यांचे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. त्यामुळे अडचणीही आहेत. त्यांना सोबत घेण्यात नदी जोड प्रकल्प रेंगाळू शकतो, त्यापेक्षा खानदेश स्वतंत्र जल सिंचन महामंडळ हवे. त्यात जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा समावेश हवा.त्याला तापीजोड प्रकल्प महटले तरी चालेल.असे मत श्री. रघुवंशी यांनी व्यक्त केले. 

संपादन- भूषण श्रीखंडे