खानदेशातील चार हजार कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती !

खानदेशातील चार हजार कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती !

नंदुरबार : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार कुटुंबातील सदस्य व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, कौशल्यावर आधारित कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आदींचा लाभ खानदेशातील तीन हजार आठशे ७३ विद्यार्थ्यांना वर्षभरात देण्यात आला. त्यावर सव्वा कोटीचा निधी खर्च झाला आहे. उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या जळगाव येथील एक, तर नंदुरबार जिल्ह्यातील दोन अशा तिघांनाच शिष्यवृत्ती देण्यात आली असून, यंत्रणा तोकडी पडत आहे. 

महाराष्ट्र कामगार मंडळ ही शासनाची संस्था आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना, उपक्रम, लहान मुलांसाठी शिशुगृहे, शिवणकाम, भाषा संभाषण, संगणक, ग्रंथपाल प्रमाणपत्र वर्ग यांसह परदेशात शिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहित केले जाते. खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कामगार कल्याण मंडळ कार्यरत आहे. वर्षभरात या मंडळातर्फे तीन हजार ८७३ कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना विविध योजना व उपक्रमाचा लाभ दिला. त्यावर मंडळाने एक कोटी २१ लाख ५० हजार १३३ रुपये खर्च केला आहे. शिष्यवृत्ती योजनेत सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना ७२ लाख ९१ हजार पाचशे रुपये वितरित करण्यात आले आहेत. 

तिघांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 
परदेश शिक्षण शिष्यवृत्ती अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एक, नंदुरबार जिल्ह्यातील दोन अशा तिघांना प्रत्येकी वार्षिक ५० हजारांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यांच्‍यावर दीड लाखाचा खर्च झाला आहे. या योजनेत कामगाराच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाते. तसेच एमपीएससी शिक्षण पूर्ण केलेल्या कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यास पाच हजारांची शिष्यवृत्ती दिली जाते. वर्षभरात या योजनेत जळगाव जिल्ह्यातील दोन, धुळे जिल्ह्यातील सात, तर नंदुरबार जिल्ह्यातील नऊ लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. एमएस-सीआयटी प्रशिक्षणांतर्गत २१८ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यात चार लाख दहा हजार पाचशे रुपयाचा निधी खर्च झाला आहे. 

पाठ्यपुस्तक सहाय्यता 
या उपक्रमांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील ३२१ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक सहाय्यता निधी देण्यात आला आहे. त्यासाठी दोन लाख ४८ हजार ७९३ रुपयांचा निधी खर्च झाला आहे. त्‍यात जळगाव जिल्ह्यातील २०७, धुळे ६३, तर नंदुरबार जिल्ह्यातील ५१ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. 

गंभीर आजार मदतनिधी 
कामगार कुटुंबीयांचा सदस्यांमधून १४४ लाभार्थ्यांना २४ लाख ४५ हजारांचा निधी गंभीर आजारावर उपचारासाठी मदत करण्यात आली. त्यात जळगाव जिल्ह्यातील १०३, धुळे जिल्ह्यातील ३८ व नंदुरबार जिल्ह्यातील तीन लाभार्थ्यांना लाभ मिळाला. 

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावर खर्च 
वर्षभरात पीएसआय, एसटीआय, आयएसओ या स्पर्धा परीक्षांसाठी पूर्वमार्गदर्शन प्रशिक्षणाचा ५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यांच्यावर साडेसात लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर इंग्रजीसह इतर भाषा संभाषण प्रशिक्षणासाठी १५० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून, त्यासाठी प्रतिविद्यार्थी एक हजार ५६० रुपये खर्च केला आहे. त्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातून १००, धुळे जिल्हा २५ व नंदुरबार जिल्ह्यातील २५ विद्यार्थ्यांनी घेतला आहे. 


संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com