दररोज दर्शन देणारा बिबट्या अखेर अडकला; पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी 

फुंदीलाल माळी
Thursday, 10 December 2020

बोरद शिवारात बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तळोदा तालुका व परिसर बिबट्यांसाठी नंदनवन ठरला आहे. यामुळे परिसरात नेहमी भीतीचे वातावरण असते. 

तळोदा  : शहराजवळील निंभोरा शिवारात गुजरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून, त्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती. पकडलेल्या बिबट्याचे वय तीन ते चार वर्षांचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र, बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने तळोदा परिसरात त्यांचा मुक्त वावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

वाचा- दिलासादायक; नंदूरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ कोटींची मदत 

तालुक्यात रोज कुठे ना कुठे आढळणाऱ्या बिबट्यांच्या पाऊलखुणा पाहता महाराष्ट्र व गुजरात वन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असते. परिसरात बिबट्यांची संख्या दोन आकड्यांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. रोज बिबट्या शेतकरी व शेतमजुरांना शेतात दर्शन देतो. बोरद शिवारात बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तळोदा तालुका व परिसर बिबट्यांसाठी नंदनवन ठरला आहे. यामुळे परिसरात नेहमी भीतीचे वातावरण असते. 
त्यासाठीच गुजरात वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी निंभोरा शिवारात विष्णू घुले यांच्या शेतात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बुधवारी (ता. ९) सकाळी तीन ते चारवर्षीय बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या पिंजऱ्यात अडकला असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर तळोदा विभागाचे वनक्षेत्रपाल नीलेश रोडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुजरात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोचले. 

दरम्यान, पकडलेल्या बिबट्याला गुजरात राज्यातील जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली. बिबट्या पकडला गेल्याने त्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar leopard was trapped in a forest department cage