एलआयसीचा हप्ता स्वॅपद्वारे भरता येणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 March 2020

डिजिटल युगात काळानुरूप बदल होत आहे. तो स्विकारत एलआयसीनेही ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नाशिक विभागात नंदुरबार शाखेत सर्व प्रथम ही सुविधा आज कार्यान्वित झाली. ग्राहकांनी लाभ घ्यावा. 
- एच.आर.महाजन, विकास अधिकारी, नंदुरबार. 

नंदुरबार : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या येथील शाखेतही आजपासून आयुर्विमा ग्राहकांना हप्ता भरण्यासाठी स्वॅप मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही सुविधा आजपासून येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. 
विमा हप्ता आजही कार्यलयात येऊन भरला जातो. अपवादात्मक स्थितीत नोकरदारांचा हप्ता पगारातून कापला जातो, मात्र आजच्या डिजिटल युगात नागरिकांना रोकड खिशात ठेवण्याचीही गरज नाही. तंत्रज्ञानामुळे विविध ऑनलाइन यंत्रणेद्वारे आर्थिक व्यवहार करण्याचे मार्ग खुले झाले आहेत. नेट बुकिंग , एटीएम, पेटीएम, गुगल पे सारख्या विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून घर बसल्या आर्थिक व्यवहार करणे शक्य झाले आहे. खिशात पैसे न बाळगता सर्व कामे करता येणे शक्य झाले आहे. याचाच भाग म्हणून एलआयसी नेही सुविधा वाढविल्या आहेत. 

आयुर्विमा हप्त्याची रक्कम रोखीने किंवा डी.डी. द्वारे भरली जात होती. त्यासाठी नागरिकांचा वेळ वाया जात होता, आजच्या स्वॅप मशीनच्या जमान्यात अनेक ग्राहकांकडे क्रेडीट व डेबिट कार्ड असल्याने त्यांना थेट कार्डाद्वारे हप्ता भरता यावा यासाठी एलआयसीनेही आता जिल्हा शाखांमध्ये स्वॅप मशीन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक विभागातून २० शाखांपैकी नंदुरबार शाखेची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. 

विभागात प्रथम नंदुरबारची निवड 
येथील एलआयसीच्या शाखेत आजपासून स्वॅप मशीन कार्यान्वित करून ही सेवा ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे. नाशिक विभागीय वरिष्ठ शाखाधिकारी गडपायले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. विभागीय वित्त व लेखाधिकारी जितेंद्र भाटीया, शाखाधिकारी सुभाष ठाकरे, साहाय्यक शाखाधिकारी अक्षय गावित, विकास अधिकारी एच.आर. महाजन आदी उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar LIC branch start swap machine cash paiment