संचारबंदीचा फज्जा; वाहनधारक, रिक्षाचालक बिनधास्‍त रस्‍त्‍यावर 

धनराज माळी
Friday, 24 July 2020

शहरातील कोरोना संसर्गाला आवर घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सुरुवातीस दर रविवारी संचारबंदी व नंतर महिन्याचा शेवटचा आठवडा पूर्णतः संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

नंदुरबार : संचारबंदीचा आज दुसरा दिवस होता. आज मात्र कालच्या पहिल्या दिवसासारखे कडकडीत बंद नसल्याचे चित्र होते. काही भागात वाहनधारकांचा सुळसुळाट दिसून आला. अनेक ठिकाणी पोलिसही तैनात नसल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिक गावात बिनधास्त वावरताना दिसून आले. त्यामुळे आठ दिवस नागरिक घरी थांबतील का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 

शहरातील कोरोना संसर्गाला आवर घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सुरुवातीस दर रविवारी संचारबंदी व नंतर महिन्याचा शेवटचा आठवडा पूर्णतः संचारबंदीचे आदेश दिले आहेत. काल पहिला दिवस होता. सर्वत्र कडक संचारबंदीचे पालन केले गेले. काल दिवसभर रस्त्यावर शुकशुकाट होता. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. आज मात्र पाहिजे तशी अंमलबजावणी झालेली नाही. शहरात बिनदिक्कत वाहनधारक प्रवेश करीत होते. रिक्षा फिरत होत्या. दूध विक्रेत्यांना केवळ सकाळी नऊपर्यंत मुभा दिली असताना सायंकाळी रात्री उशिरापर्यंत दूध विक्रेते चौकात बसून दूध विक्री करीत होते. दूध घेण्याचा नावाखाली अनेकजण फिरत होते. आज काहीजण शेतकरी असल्याची बतावणी करून तर काहींनी दवाखान्याचा बनाव करून गावात फिरताना दिसून आले. पोलिसांनीही आज फारसे मनावर घेतलेले नव्हते. अनेक ठिकाणी पोलिस होते, मात्र तेही मोबाईलमध्ये गुंग दिसून आले. त्यामुळे कोण येते आहे, व कोण जाते आहे. त्याचे कोणालाही काही देणे -घेणे नव्हते. त्यामुळे आज दुसरा दिवस काही अंशी संचारबंदीचे उल्लंघन करणारा ठरला. मात्र उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. 

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar lockdown not follow rules in city