esakal | रोजगारासाठी मजूर गुजरातकडे 
sakal

बोलून बातमी शोधा

worker

जळगाव, धुळे व नंदुरबार परिसरातील भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक विचार केला, तर खानदेशातील जीवनचक्र व अर्थचक्र शेतीवरच अवलंबून आहे. त्यातच वाढती लोकसंख्या आणि दर वर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडणारे शेकडो बेरोजगार युवकांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

रोजगारासाठी मजूर गुजरातकडे 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर होताच महामारीच्या संसर्गापासून जीव वाचविण्यासाठी गुजरातमध्ये कामधंद्यानिमित्त स्थायिक झालेली खानदेशी कुटुंबे आपापल्या गावाकडे परतली होती. लॉकडाउनमधील परिस्थिती लक्षात घेता आता गाव सोडून जायचे नाही, येथेच मिळेल ते काम करू, असे म्हणणाऱ्या खानदेशातील हजारो कामगार व मजुरांनी पुन्हा गुजरातची वाट धरली आहे. त्यामुळे खानदेशातील शेकडो मजुरांनी पुन्हा गुजरातमध्ये जात आपले पूर्वीचे कामधंदे करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे खानदेशातील कामगारांना गुजरातमध्ये रोजगारासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 
जळगाव, धुळे व नंदुरबार परिसरातील भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक विचार केला, तर खानदेशातील जीवनचक्र व अर्थचक्र शेतीवरच अवलंबून आहे. त्यातच वाढती लोकसंख्या आणि दर वर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडणारे शेकडो बेरोजगार युवकांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच जळगाव व धुळे येथे औद्योगिक वसाहती असल्यामुळे व मोठी शहरे असल्याने काहींना काही लहान- मोठी नोकरी मिळू शकते. मात्र सर्वसामान्य मजुरांपुढे रोजगाराची गंभीर समस्या कायम आहे. शेती निसर्गचक्रावर अवलंबून आहे. त्यामुळे आता शेतीच्या उत्पन्नाची हमी शेतकरीही स्वतः देऊ शकत नाही. त्यामुळे रोजगार हा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. अशा स्थितीत लगतचे गुजरात राज्य खानदेशी मजुरांसाठी व बेरोजगारांसाठी वरदानच ठरले आहे. रोजगारासाठी सुरत-उधनाची वाट धरतात. त्यामुळे आज अनेक पिढ्या सुरत, उधना, बारडोली, नवसारी, वापी, दमण येथे स्थिरावल्या आहेत. 

गावाकडे आलेले पुन्हा परतले 
२३ मार्चपासून देशात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे वर्षानुवर्षे राहून गुजरातमध्ये स्थायिक झालेली कुटुंबेही मिळेल त्या वाहनाने, अथवा पायपीट करत आपापल्या गावाकडे परतली होती. साधारण तीन महिने गावाकडे राहिले. वर्षानुवर्षे पडलेली घरे दुरुस्त करून आता येथे थांबायचे, असा विचार करून आपले बस्तान मांडले. काहींनी तात्पुरते रोजगार केले. तर काहींना काहीही थारा राहिला नाही. ज्यांना गुजरातमध्ये संच मशिन (यंत्रमाग) चालविण्याची सवय झाली, ते येथे रमले नाहीत. त्यामुळे १७ जूनपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच अनेकांनी पुन्हा सुरत-उधनाची वाट धरली आहे. 

तीन महिने गावाकडे होतो. हाताला काम नाही. रोजगाराचे साधन नाही. मी सुरत येथे यंत्रमाग मशिन कारागीर आहे. लॉकडाउन शिथिल होताच यंत्रमागाची कामे सुरू झाली. कारखानदारांचे फोन आले. त्यांनी बोलावले म्हणून पुन्हा सुरतला परतलो. कामे सुरू झाली. आमची रुटिंग लागली. कोरोना संसर्ग सुरूच आहे. मात्र किती दिवस कामधंदे बंद ठेवणार. पोटासाठी कामे करावी लागणारच. काळजी घेऊन कामे सुरू केली आहेत. 
-रवींद्र पाटील (यंत्रमाग कारागीर, उधना, गुजरात)

loading image