सुरक्षित गावाला बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे बाधा; ३२ जण क्वॉरंटाईन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

मंदाणे येथील एक परिवार अहमदाबाद येथे नोकरी निमित्त स्थायिक झाले आहे. त्या परिवारातील ५२ वर्षीय महिला गावी काही दिवसापूर्वी परतली होती. येथे आल्यानंतर प्रकृती बिघडल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतला.संबंधित डॉक्टरांनी त्याची न्यूमोनियाची चाचणी केली. मात्र कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्याने मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्यात आले.

मंदाणे (नंदुरबार)  : कोरोणा संसर्गाला दूर ठेवण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून ग्रामस्थांनी गाव सुरक्षित ठेवले होते. मात्र अहमदाबादहून आलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावासह परिसरात खळबळ उडाली आहे.विशेषतः महिलांमध्ये कमालीची भिती पसरली आहे. प्रशासनाने व आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून महिलेचा संपर्क साखळीतील ३२ जणांना क्वॉरंटाईन केले आहे. 

मंदाणे येथील एक परिवार अहमदाबाद येथे नोकरी निमित्त स्थायिक झाले आहे. त्या परिवारातील ५२ वर्षीय महिला गावी काही दिवसापूर्वी परतली होती. येथे आल्यानंतर प्रकृती बिघडल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतला.संबंधित डॉक्टरांनी त्याची न्यूमोनियाची चाचणी केली. मात्र कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्याने मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्यात आले.त्या महिलेला तातडीने जिल्हा रुग्णालयात १३ जूनला दाखल करण्यात आले. १४ जूनला रात्री दहाला स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त गावात धडकले. एकच खळबळ उडाली . 

३२ जण क्वॉरंटाईन 
प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोर पालन केले. ग्रामपंचायतीने स्थानिक स्तरावर योग्य नियोजन केले. आरोग्य विभागाने उपाययोजना केली असतांना गाव अत्यंत सुरक्षित होते. अशा परिस्थितीत रात्री उशिरा आलेल्या अहवालानंतर प्रशासनही खडबडून जागे झाले.अहमदाबाद येथून आलेल्या एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे रुग्णाच्या संपर्कातील मंदाणे व असलोद येथील तब्बल ३२ जणांना प्रशासनाने ताब्यात घेऊन मोहीदा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. त्यात २४ महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. तसेच या महिलेने उपचार घेतलेल्या असलोद व मंदाणे येथील खासगी डॉक्टरांना परिसरातील १२ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. 

महिलांमध्ये भिती 
विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संक्रमण होऊ नये म्हणून गावात ठिकठिकाणी बॅरिकेट्‌स लावण्यात येऊन अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. रुग्णाचा रहिवास असलेला परिसर, मेनरोड, बाजारपेठेसह परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक सजन नजन पाटील हे लक्ष ठेवून आहेत. ग्रामस्थांनी घाबरुन न जाता दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच विजय सनेर, पंचायत समिती सदस्या सुषमा साळुंके, उपसरपंच अनिल भामरे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, पोलिस पाटील सुभाष भिल, तलाठी धनगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले आहे. 

गावाचा सीमा सील 
मंदाणे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून तर असलोद, भोरटेक, वडगाव, तितरी, वाघर्डे, भोंगरे, ओझर्टे, कलमाडीतर्फे हवेली, दुधखेडा ही गावे बफर झोन म्हणून प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी जाहीर केले आहेत. मंदाणे गावात अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व वाहनांना प्रतिबंध करण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar madane village corona positive case and 32 qurantine