
नंदुरबार जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून देण्यात आलेल्या निवेदनात मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या भावना कळविण्यात आल्या आहेत.
नंदुरबार : एप्रिल, मे, जून महिन्यांत अनेक खाजगी आस्थापनांची कार्यालय बंद होती. तरीही त्यांना भरभक्कम वीज देयकं पाठवून महाआघाडी शासनाने जनतेला शॉक दिला आहे. ती अवाजवी वीजबिले कमी करण्यासाठी मनसेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत वीजबिले कमी न केल्यास शासनालाच शॉक देऊ, असा इशारा देण्यात आला आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून देण्यात आलेल्या निवेदनात मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या भावना कळविण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले आहे, की एप्रिल महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले, व्यवसायांना घरघर लागली, अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती तर दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण ह्या दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असताना महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीजबिल पाठवून शॉक दिला.
तीन महिन्याचे बिल एकाच महिन्यात
एरवी वर्षभराचे वीज देयक जितके येते तितक्या विजेची आकारणी केवळ तीन महिन्यांच्या वापराबाबत सरकारने जनतेला पाठवली. एप्रिल, मे, जून महिन्यांत अनेक खाजगी आस्थापनांची कार्यालय बंद होती. पण तरीही त्यांना पण भरभक्कम वीज देयके पाठवली. हे सरकार जनतेलाच वाढीव वीज आकारणीचा 'शॉक' देणार असेल; तर मग आम्हाला पण जनतेच्यावतीने सरकारला 'शॉक' द्यावा लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहराध्यक्ष ईश्वर ठाकूर, विवेक ठाकूर, पवनकुमार गवळी, राकेश माळी, प्रवीण जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.