मेजवानीला पन्नास पेक्षा जास्त जणांना आमंत्रण... अखेर गुन्हा दाखल झाला ! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

पार्टी झाली, चार दिवस उलटले, मात्र परवेजखान यांचे नातेवाईक असलेले व खानसामा असलेल्या व्यक्तीचा कोरोना बाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची अन पार्टीत ती व्यक्तीही होती

नंदुरबार  : लॉकडाऊन असताना मुलाच्या विवाहप्रित्यर्थ एका फार्म हाऊसवर राजकीय पदाधिकारी व मित्रांना दिलेल्या मेजवानी पार्टीप्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार अखेर आज मेजवानीचे आयोजक तथा माजी उपनगराध्यक्ष परवेझखान यांच्याविरोधात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आज तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या मेजवानीत ५० जणांची परवानगी घेत त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना निमंत्रण देण्यात आल्याने लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

मेजवानीत अनेक राजकीय पदाधिकारींसह वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाल्याचे तसेच त्या पार्टीतील खानसामाचा स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या चर्चेने गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काल जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार येथील माजी उपनगराध्यक्ष परवेज खान यांनी ३० जून २०२० पर्यंत मनाई आदेश लागू असताना त्याचा भंग करून मौजे झराळी येथील फार्म हाऊसवर मुलाच्या लग्न समारंभानिमित्त स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास ५० व्यक्तींची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. अशाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याने आणि संसर्गजन्य आजार पसरून मानवी जीवितास धोका उत्पन्न होण्याची ही कृती केल्याने प्रकरणी गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 268, 269, 290 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 54 आणि साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 नुसार नंदुरबार तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परवेजखान करामत खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पार्टीचे गुड असे झाले उघड 
माजी उपनगराध्यक्ष परवेजखान यांनी मुलाच्या लग्नाप्रित्यर्थ दिलेल्या मेजवानी पार्टीत अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. पार्टी झाली, चार दिवस उलटले, मात्र परवेजखान यांचे नातेवाईक असलेले व खानसामा असलेल्या व्यक्तीचा कोरोना बाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची अन पार्टीत ती व्यक्तीही होती अशी चर्चा सुरू झाली. त्या चर्चेवरून मेजवानी पार्टीचे गुपित उघड झाले. तोपर्यंत मेजवानी पार्टी कोणी, कुठे व का दिली याची कुठेही वाच्यताही नव्हती. मात्र मेजवानीतील पॉझिटिव्हच्या चर्चेने शहर ढवळून निघाले. 

तो व्यक्ती पार्टीत नव्हता 
कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह निघालेला खानसामा त्या पार्टीत नव्हते. त्या पार्टीसाठी सुरत येथील खानसामा मागविण्यात आला होता असे स्पष्टीकरण आयोजक परवेजखान यांनी दिले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल 
कोरोना नियमांचे उल्लंघन अन मेजवानीचे प्रकरण माध्यमांनी उचलल्याने त्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड यांनी उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांना या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने ४८ तासात चौकशी करून ५० जणांची परवानगी असतांना त्यापेक्षा अधिक व्यक्तींना आमंत्रित करून नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे तहसीलदारांनी तालुका पोलिसात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Marriage feast esshu Eventually the crime was filed