esakal | मनरेगाचा सहा महिन्यांत ५८ कोटी ३५ लाखांचा निधी खर्च 
sakal

बोलून बातमी शोधा

mgnrega

मनरेगा अंतर्गत कोरोना संकटात एकाच दिवशी ६४ हजारांपेक्षा अधिक मजुरांना रोजगार मिळाला. मनरेगा अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात एकूण ६६ कोटी ९५ लाख खर्च झाला होता

मनरेगाचा सहा महिन्यांत ५८ कोटी ३५ लाखांचा निधी खर्च 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : जिल्ह्यात लॉकडाउन असताना जिल्हा प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले. सहा महिन्यांत २१ लाख ३० हजार मनुष्य दिवस निर्माण झाले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांतच ४४ टक्के खर्च झाला असून, ४१ टक्के मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे. सहा महिन्यांतच ५८ कोटी ३५ लाख रुपयाचा निधी या कामांवर खर्च झाला आहे. 
मनरेगा अंतर्गत कोरोना संकटात एकाच दिवशी ६४ हजारांपेक्षा अधिक मजुरांना रोजगार मिळाला. मनरेगा अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात एकूण ६६ कोटी ९५ लाख खर्च झाला होता आणि एकूण २५ लाख ३२ हजार मनुष्य दिवस निर्माण झाले होते. या आर्थिक वर्षात पहिल्या ६ महिन्यांतच ५८ कोटी ३५ लाख निधी खर्च करण्यात आला असून, २१ लाख ३० हजार मनुष्य दिवस निर्माण झाले आहेत. मे महिन्यात एकावेळी ४७ हजार ४८८ कुटुंबातील व्यक्तींना रोजगार मिळाला होता. गेल्या वर्षीच्या मनुष्य दिवसाच्या तुलनेत या वर्षात ८४ टक्के मनुष्य दिवस निर्मिती ही केवळ मागील सहा महिन्यात साध्य करण्यात आली आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत ८७ टक्के खर्च केवळ मागील तीन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आला आहे. 

या कामांना प्राधान्य 
मनरेगाच्या कामात ग्रामपंचायत, वने, सामाजिक वनीकरण, कृषी आदी विविध विभागांनी कामे हाती घेतली आहेत. उन्हाळ्यात गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. त्यावर ५ कोटी खर्च करण्यात आला. या कामांमुळे जलस्रोतातील पाणीसाठा वाढला असून, त्याचा लाभ परिसरातील नागरिकांना होणार आहे. पावसाळ्यात वृक्षारोपण, नर्सरी, फळझाडे लागवड आदी कामांना प्राधान्य देण्यात आले. मनरेगा अंतर्गत घरकुल बांधणीच्या कामांनाही वेग देण्यात आला. 

गावात रोजगार देण्याचा प्रयत्‍न 
येत्या काळात डीएम फेलोजच्या सहकार्याने अधिक स्थलांतर होणाऱ्या प्रत्येक गावात नर्सरी तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. इतर रोपांबरोबर फळझाडांची लागवडही येत्या पावसाळ्यात करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मनरेगाच्या माध्यमातून गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे