शाळेची घंटा सोमवारपासून वाजणार; करावे लागणार मार्गदर्शक सुचनांचे पालन 

धनराज माळी
Saturday, 21 November 2020

शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर उपाययोजना शालेय व क्रीडा विभागाने दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील. 

नंदुरबार : जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग, वसतिगृह, आश्रमशाळा विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सोमवार (ता. २३)पासून सुरू करण्यास अनुमती दिली आहे. आठ महिन्यांनंतर नववी ते बारावीच्या वर्गांची घंटा वाजणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सूचनांचे पालन शाळा व्यवस्थापनाने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले. 
 

पालकांची संमती आवश्यक 
शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत पूर्वनियोजन, खबरदारीबाबत बैठक घेऊन उपाययोजनांबाबत माहिती द्यावी व कोरोनाबाबत जनजागृती करावी. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून संमती घ्यावी. यात शिक्षण ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीच्या अवलंबाबाबतही संमती घेऊन त्यांची स्वतंत्र यादी करावी. 

शिक्षकांसाठी चाचणी आवश्यक 
शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चाचणीचे प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करणे बंधनकारक असेल. प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी. 

या सुविधा बंधनकारक 
थर्मामीटर, ऑक्सिमीटर, थर्मल गन, जंतुनाशक, साबण, पाणी आदी आवश्यक वस्तूंची उपलब्धता बंधनकारक आहे. यासाठी लागणारा निधी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीकडून घ्यावा. शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने करावी. शाळेच्या दर्शनी भागावर शारीरिक अंतर, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आदींसंदर्भात फलक लावणे बंधनकारक असेल. वर्गखोली तसेच स्टाफरूममधील बैठकव्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठकव्यवस्था असावी. 

कार्यगट समिती 
शाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कार्यगट गठित करावेत. (उदा. स्वच्छता, पर्यवेक्षण, आपत्कालीन गट,) शाळेतील उपस्थिती व वैद्यकीय रजांच्या धोरणांमध्ये सुधारणा करावी. विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून त्यांची नावे, पत्ता तसेच आरोग्य स्थिती, आरोग्यसेतू ॲपवरील तपासणी अहवाल, अलीकडील आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य प्रवास आदी माहिती स्वयंघोषित करून घ्यावी. 
 
पालकांसाठी सूचना 
संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे. स्कूलबसचे दिवसातून किमान दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे. गर्दी होऊ शकते, असे परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रमांवर निर्बंध असेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. अजून काही सूचना आल्यास त्यांचे अनुपालन करावे, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar monday school open but coronavirus follow rules