नंदुरबार बाजार समितीत हमाल मापाडींचे काम बंद आंदोलन 

धनराज माळी  
Friday, 27 November 2020

मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होत बाजार समितीच्या कार्यालयावरच आपला मोर्चा नेला.तुमचा वाद काहीही असो ,आमचा मालाचा लिलाव होऊन मोजमाप झाले पाहिजे

नंदुरबार  ः हमाल मापाडींची दर तीन वर्षांनी होणारी दरवाढीची मुदत संपून २७ दिवस उलटले तरीही व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद नाही, त्यामुळे काल पासून हमाल मापाडींनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मध्यस्थीने काल दुपारनंतर हाल मापाडींनी कामाला सुरूवात केली. मात्र आज पुन्हा काम बंद ठेवल्याने शेतकरी जेरीस आले. 

आवश्य वाचा- हंगामी पोलिस निरीक्षक आले काय अन्‌ गेले काय; चोरांना फावते
 

आज मिरचीची प्रचंड आवक 
दरम्यान, आज मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होत बाजार समितीच्या कार्यालयावरच आपला मोर्चा नेला.तुमचा वाद काहीही असो ,आमचा मालाचा लिलाव होऊन मोजमाप झाले पाहिजे . शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून बाजार समिती प्रशासनाने पुन्हा श्री. रघुवंशी यांचा दरबारात हा वद नेला. तेथे व्यापारी, शेतकरी, हमाल-मापाडी यांच्यात चर्चा घडवून आजचा मालाचा लिलाव व मोजमाप करून देण्याचा निर्णय झाला.मात्र पुढील निर्णय होईपर्यंत उद्या (ता.२८) पासून हमाल मापाडींचे काम बंद सुरूच राहणार आहे. 

३१ ऑक्टोबरला मुदत पूर्ण 
हमाल मापाडींची तोलाईच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ करण्यात येते . तीन वर्षाचा करार हा ३१ ऑक्टोबरला संपला होता .१ नोव्हेंबरपासून नवीन दर मिळणे आवश्यक होते . परंतु विविध कारणांमुळे ते होऊ शकले नाही . या दरम्यान हमाल -मापाडी यांच्यात बैठकाही झाली मात्र निर्णय झाला नव्हता . त्यामुळे गुरुवारी दुपारून हमाल मापाडींनी तोलाई व हमालीचे काम बंद केले होते. 

शेतकरी हवाल दिल 
तोलाई व हमालीचे काम बंद झाल्याने शेतकरी व व्यापारीचा शेतमाल बाजार समितीत उघड्यावर पडून होता. सद्या ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतीमालाचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात होती . त्यामुळे शेतकरी व व्यापारी देखील चिंतेत होते. सकाळी हमाल मापाडींनी शेतकऱ्यांचा माल भरून देण्यास तयारी दर्शविली.कामही सुरू केले. 

रघुवंशी यांच्या उपस्थितीत बैठक 
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत व्यापारी प्रतिनिधी , हमाल मापाडी प्रतिनिधी, बाजार समिती संचालक यांची बैठक झाली. यावेळी बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील , व्यापारी प्रतिनिधी हरीश जैन , महेश जैन , हमाल मापाडी प्रतिनिधी कैलास पाटील , संतोष पाटील , बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर व संचालक मंडळ उपस्थित होते. रघुवंशी यांनी दोन्ही बाजू ऐकून सद्या विधान परिषद आचारसंहिता असल्याने निर्णय घेता येणार नाही . त्यामुळे ५ डिसेंबरला बैठक घेऊन यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगून हमाल मापाडींनी कामाला लागावे , असे आवाहन केले. त्यानंतर काही वेळ कामकाज केल्यानंतर पुन्हा कामबंद आंदोलन झाले. 

 

वाचा- वाटते देवाने पोट दिले नसते तर बरे झाले असते.
 

आजपासून बाजार समिती बंद 
दरवाढीचा प्रश्न येत्या १० दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिल्यानंतर बाजार समितीला हमाली व तोलाईचे काम गुरुवारी दुपारनंतर सुरू करण्यात आले . सायंकाळी पुन्हा कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले . त्यामुळे शेकडो क्विंटल शेतीमाल उघड्यावर पडून आहे . दरम्यान , बाजार समिती सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार 
समितीने केले आहे  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Movement to stop work of porters in Nandurbar market committee