नाम फाउंडेशन, विश्वास पाटीलांना पुरुषोत्तम पुरस्‍कार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाम फाउंडेशन, पुणे ही संस्था मराठी सिनेअभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केली आहे. या संस्थेला पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्राप्त झाला आहे.

शहादा (नंदुरबार) : येथील पी. के. अण्णापाटील फाउंडेशनतर्फे यावर्षीचा संस्था स्तरावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या ‘नाम फाऊंडेशन’ तर व्यक्तिगत स्तरावर ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांना पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ९ ऑक्टोबरला सहकारमहर्षी स्व. अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंती दिनी किसान व विचार मंथन दिनाच्या कार्यक्रमात पुरस्कार दिले जाणार आहेत. अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली. रोख एक लाख रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृती चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे अठरावे वर्ष आहे. 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाम फाउंडेशन, पुणे ही संस्था मराठी सिनेअभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केली आहे. या संस्थेला पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेच्या वतीने अभिनेता मकरंद अनासपुरे पुरस्कार स्वीकारणार आहेत. व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांना दिला जाणार आहे. ते मराठी कादंबरी क्षेत्रातील बेस्टसेलर कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असून ऐतिहासिक कादंबरी लेखन हा जिव्हाळ्याचा विषय आहे. पानिपत, संभाजी, महानायक या त्यांच्या कादंबऱ्यांनी विक्रीचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. नाम फाउंडेशन यांचे निःस्वार्थ जनसेवा आणि विश्वास पाटील यांचा साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून पुरुषोत्तम पुरस्कार दिला जाणार आहे. अशी माहिती फाउंडेशनचे सचिव प्रा. मकरंद पाटील यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar naam foundation vishwas patil purushottum award