esakal | प्रशासनाच्या हाकेला साद; मुंबईस्थित डॉक्टर सुपुत्राची जिल्हा रुग्णालयात सेवा
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar civil

प्रशासनाच्या हाकेला साद; मुंबईस्थित डॉक्टर सुपुत्राची जिल्हा रुग्णालयात सेवा

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : नंदुरबार जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त झाल्याने उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता जाणवत होती. यासाठी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांनी काही काळासाठी नंदुरबार जिल्ह्यात सेवा द्यावी; अशी विनंती केली. त्याला तळोद्याचे सुपुत्र असलेले मुंबईस्थित एमडी मेडिसीन डॉ. योगेश्वर चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून डॉ. चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून जिल्ह्यातील दुर्गम भागात देखील मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी प्रशासनाने नवीन २०० बेड वाढविण्याचे नियोजन केले होते. मात्र त्यासाठी तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता भासत होती. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील भूमिपुत्रांची मदत घेण्याचे निश्चित करण्यात आले. स्वतः जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पुढाकार घेत काही डॉक्टरांशी संपर्क साधला व त्यांना या कठीण समयी आपली सेवा जिल्ह्यासाठी देण्याचे आवाहन केले. तसेच आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री अँड. के. सी. पाडवी यांनी देखील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत पत्र देवून, तज्ञ डॉक्टरांना दोन महिन्यांकरिता नंदुरबार जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.

तळोद्याचा भूमिपुत्र आला कामी

तळोद्याचे सुपुत्र व सध्या मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे डॉ. योगेश्वर चौधरी (एमडी मेडिसीन) यांच्याशी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी संपर्क साधला. त्यावेळी डॉ. चौधरी यांनी ते नंदुरबार जिल्ह्यात काम करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी नुकतीच डॉ. योगेश्वर चौधरी यांना याबाबत परवानगी दिल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार डॉ. योगेश्वर चौधरी यांनी शनिवार (ता. २४) पासून नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोनाचा रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली आहे. या संकटसमयी डॉ. चौधरी यांनी जिल्ह्यात काम करण्यास होकार दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाचा परिस्थितीवर मात करण्यासाठी आरोग्य विभागाचे सर्वच अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात सेवा देण्यासंदर्भात वरिष्ठ प्रशासनाकडून विचारणा होताच त्वरित होकार दिला; अशा कठीण परिस्थितीत मी माझ्या जिल्ह्याच्या कामी येत आहे, हे मी माझं सौभाग्य समजतो.

- डॉ. योगेश्वर चौधरी, सर जे. जे. हॉस्पिटल, मुंबई

संपादन- राजेश सोनवणे

loading image