esakal | नंदुरबारला रेल्वे कोविड कोचमध्ये उपचार सुरू

बोलून बातमी शोधा

railway covid center

नंदुरबारला रेल्वे कोविड कोचमध्ये उपचार सुरू

sakal_logo
By
धनराज माळी

चिचपाडा (नंदुरबार) : वाढत्या रुग्ण संख्येमुळे सुविधा अपुऱ्या पडत असल्याने जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी महाराष्ट्र शासनाकडे रेल्वे कोविड कोच (आयसोलेशन वॉर्ड) ची मागणी केल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नंदुरबार रेल्वे स्थानकात ३१ डब्यांची द्वितीय श्रेणीची रेल्वे गाडी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पाठवली आहे. रविवारी सायंकाळपासून या रेल्वे कोविड कोच सेंटरमध्ये सोमवारी (ता. १९) १८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहे.

जेवण, चहा, नाश्तासह मोफत उपचार

रेल्वे कोविड कोचसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे बाधित रुग्णांच्या उपचारासाठी २४ तास डॉक्टर्स, कर्मचारी, सुरक्षारक्षक उपलब्ध केले आहे. रुग्णांना जेवण, चहा, नाष्टा व उपचार मोफत दिले जात असून वाढत्या तापमानामुळे रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वेच्या छतावर गोणपाट टाकून पाणी शिंपडले जात आहे. तर प्रत्येक कोच जवळ कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे आयसोलेशन वॉर्ड मध्ये मिळत असलेल्या सुविधा व डॉक्टर देखील मित्राप्रमाणे सर्व गोष्टींची काळजी घेऊन उपचार देत असल्याने रुग्णांनी आनंद व्यक्त केला आहे.

तीन डॉक्‍टरांची नेमणूक

रेल्वे कोविड कोचमध्ये अक्कलकुवा जामिया येथील डॉ. सैय्यद अरसलान अहेमद, डॉ. ज़ाहिद अन्सारी, डॉ. राजपूत उमर यांची नेमणूक करण्यात आली असून रेल्वे कोविड कोचमध्ये सेवा देताना आमच्या जीवनातला हा वेगळा अनुभव असल्याने आनंद व्यक्त केला. तर प्राध्यापक डॉ. दिनेश देवरे व कमलेश अहिरे, एस. बी. पवार, बी. एस. कपूरे यांची झोनल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आल्याने रुग्णांना चांगली सेवा देण्याचे काम पार पाडत आहे.

रेल्वे मध्ये उपचार घेताना अत्यंत चांगले वाटले. डॉक्टरांनी मित्राप्रमाणे विचारपूस करून दिवसातून पाच वेळा ऑक्सिजन, टेंपरेचर चेक करून उपचार देतात. जेवण, पाणी, साफसफाई सर्व गोष्टी चांगल्या आहेत. रात्रीसुद्धा डॉक्टर उपचारासाठी हजर होतात. रात्री मच्छरांपासून बचाव करण्यासाठी मार्टिनची सुविधादेखील उपलब्ध करून दिली. रेल्वेने भरपूर वेळा प्रवास केला आहे परंतु येथे उपचार घेताना एखाद्या ट्रीप ला जात असल्यासारखं वाटते कारण डॉक्टर देखील मित्राप्रमाणे वागतात.

- कुणाल नागरे (रुग्ण)

रेल्वे आयसोलेशन कोच सुरुवात करण्याचा मुख्य उद्देश जिल्ह्यात आरोग्य व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न आहे. डॉक्टर्स, नर्स रजिस्ट्रेशन कर्मचारी जिल्हा प्रशासनाचे तर सुरक्षा कर्मचारी पाणी, साफसफाई आदी सुविधा रेल्वेतर्फे देण्यात आल्या आहे. भारतात प्रथमच रेल्वेद्वारे तापमान कमी करण्यासाठी छतावर गोणपाट भिजत टाकून कोचसमोर कुलरची व्यवस्था करून वातानुकूलित वातावरण केले आहे. सर्व रुग्णांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने बाधित रुग्णांनी स्वतःला अलगीकरण करून घ्यावे असे आवाहन करतो.

- डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी, नंदुरबार.

संपादन- राजेश सोनवणे