नंदुरबार पालिकेने घेतला मोठा निर्णय; मालमत्‍ता कर भरणा, गाळेधारकांना दिलासा

धनराज माळी
Friday, 16 October 2020

कोरोनाचा पार्श्‍वभूमीवर शहरातील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचे बिल मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत संपूर्ण मालमत्ता कर भरल्यास नागरिकांना करातून१० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपालिकेच्या व्यापारी संकुल, ओटे, दुकाने, गाळेधारकांचे एप्रिल, मे व जून असे तीन महिन्याचे भाडे माफ करणार आहोत. 

- रत्ना रघुवंशी,नगराध्यक्षा-नंदुरबार 

नंदुरबार : शहरातील विविध भागातील रसत्यांचा कामासाठी ६९ लाखाचा निधी, मालमत्ता करात १० टक्के सूट व व्यापाऱी गाळे धारकांना तीन महिन्याचे भाडे माफ करण्यासह शहर विकासाचे २१ विषयांना पालिकेच्या आज झालेल्या ऑनलाइन सवर्सभेत मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या या निणर्यामुळे व्यापारी व व्यावसायिक आणि शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. सभेत मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, अभियंता शाम करंजे, विविध विषयांचे सभापती व नगरसेवकांनी सहभाग घेतला. 

या विषयांना मंजुरी 
या सभेत पालिका हद्दीतील खासगी जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी ना हरकत दाखला देणे, पालिकेच्या राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकस्तर वेतन श्रेणीवर विचार विनिमय करून मंजुरी देणे. शहरालगतचे सर्वे नंबर ३९६ चे कृषक क्षेत्र शेती प्रभागातून वगळून बिनशेती करून रहिवास प्रभागात समाविष्ट करणे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र व भुयारी गटार योजनेच्या संकलन व्यवस्था देखभाल-दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे यासह शहर विकासाला चालना देणाऱ्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.कोरोना साथरोग महामारीचा पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील मालमत्ताधारकांना करातून १० टक्‍के सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिकेच्या सभेत आज घेण्यात आला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चाललेल्या २० मिनिटांच्या सभेत २१ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. 

या रस्त्यांना मंजुरी 
पालिकेच्या सभेत अजेंड्यावरील विषय क्रमांक३ व ६ मध्ये दशर्विण्यात आलेल्या रस्त्यांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. त्यात सी.बी टाऊनमधील प्लॉट क्र.२ ते ७,१४ ते १३२,१३२ ते १३८ पर्यंत रस्ता खडीकरण,डांबरीकरण कामासाठी ३५ लाख ३८ हजार ६७१ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच समर्थ मंगल तिर्थ नगरातील प्लॉट क्र.१ ते ४९ व ६५ ते ३२७ पर्यंत रस्ता खडीकरण कामासाठी ३३ लाख ७० हजार ९१८ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली. दोन्ही कामे मिळून ६९ लाख ९ हजार ५८९ रुपयांची रस्ता विकास कामे होणार आहेत. 

 

व्यापाऱ्यांमध्ये समाधान 
कोरोनाचा महामारीने होरपळलेल्या व्यापाऱ्यांना पालिकेने तीन महिन्याचे भाडे माफ करून दिलासा दिला आहे. पालिकेच्या या निणर्यामुळे लहान -मोठे गाळेधारक व्यापारी भारावले असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.पालिकेच्या निणर्याचे स्वागत केले आहे. 
 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar palika decision malmatta tax and gadedharak