मुख्यमंत्र्यांच्या खर्चास भाजप नगरसेवकांचा विरोध 

सकाळ वृत्तेसवा
Tuesday, 28 January 2020

मुख्यमंत्री हे शासनाच्या खर्चातून येतात. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून खर्च करण्यात येऊ नये, असा आक्षेप घेत त्या उलट सदरचा खर्चासाठीच्या नियोजित रकमेतून नागरिकांची घरपट्टी माफ करावी, विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा खर्च करावा

नंदुरबार  : नगर पालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदुरबारात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून होणारा संभाव्य खर्चाचा विषयावर चर्चा करतांना त्यावर विरोधी गटाचे भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत त्या खर्चास मंजुरी देण्यास विरोध दर्शविला. यावेळी विशेष सभेत एकच गदारोळ सुरू झाला होता. 

नंदुरबार नगरपालिकेची विशेष सभा प्रभारी नगराध्यक्षा तथा उपनगराध्यक्षा भारती राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या सभेत विषय पत्रिकेवरील दहा विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र पालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या विविध विकास कामे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमासाठी लवकरच मुख्यमंत्री नंदुरबार येथे येणार आहेत. त्याकरिता पालिकेतर्फे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. त्या कार्यक्रमासाठी पालिकेचा खर्च होणार आहे. त्यासाठी आजच्या विशेष सभेत त्या दौऱ्यासाठीचा खर्चास मंजुरीबाबतचा विषय विषय पत्रिकेवर होता. तो विषय चर्चेस येताच विरोधी गटाचे म्हणजेच भाजपच्या नगरसेवकांनी एकमुखाने विरोध दर्शविला. 

 

मग का करावा खर्च

मुख्यमंत्री हे शासनाच्या खर्चातून येतात. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून खर्च करण्यात येऊ नये, असा आक्षेप घेत त्या उलट सदरचा खर्चासाठीच्या नियोजित रकमेतून नागरिकांची घरपट्टी माफ करावी, विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा खर्च करावा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. त्यामुळे आजच्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या खर्चाचा विषय चांगला गाजला.भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विकास कामांच्या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाबाबत आक्षेप घेतला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar palika sabha cm thakre tour Expenditure not allow BJP member