आता बसल्याजागी मिळणार बसचे लोकेशन 

नीलेश पाटील
Friday, 23 October 2020

एसटी गाड्यांचा वक्तशीरपणा वाढून वेळापत्रक सुधारावे, प्रवाशांना बसची सध्याची स्थिती समजण्यास मदत व्हावी तसेच बसचा अपघात झाल्यास त्याची माहिती महामंडळाला त्वरित मिळावी,

शनिमांडळ (नंदुरबार) : बस आगार किंवा स्थानकात गाडीची वाट पाहत ताटकळत उभे राहिलेल्या प्रवाशांचे हाल येत्या काळात बंद होणार आहे. प्रवाशांना आता बसचा ठावठिकाणाच बसल्याजागी समजणार आहे. त्यासाठी सर्व बसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा (व्हिटीएस) बसविण्यात येत असून, एखादी गाडी नेमकी कुठपर्यंत पोचली याचा माग काढता येईल. गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची अस्वस्थता कमी करण्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. 
एसटी गाड्यांचा वक्तशीरपणा वाढून वेळापत्रक सुधारावे, प्रवाशांना बसची सध्याची स्थिती समजण्यास मदत व्हावी तसेच बसचा अपघात झाल्यास त्याची माहिती महामंडळाला त्वरित मिळावी, यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्हीटीएस प्रणालीचा प्रारंभ केला. नाशिक आगारातील गाड्यांमध्ये ही प्रणाली सुरू झाली. राज्यातही प्रणाली बसवण्यास सुरवात झाली. मार्च २०२० पर्यंत सर्व बसगाड्यांना व्हीटीएस बसवून प्रवाशांच्या सेवेत आणली जाणार होती. मात्र, कोरोनाकाळात हे काम पूर्णपणे थांबले .आता या कामाला पुन्हा सुरवात झाली आहे. महामंडळाच्या ताब्यातील १८ हजारांपैकी १६ हजार गाड्यांना ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत ही यंत्रणा पूर्णपणे लागू होणार आहे. त्यानंतर डिसेंबरपासून ही प्रणाली प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यात निमआराम, वातानुकूलित बसचा समावेश आहे. एसटीकडून ही सुविधा प्रवाशांना मोबाईलवरही देण्यात येणार आहे. 

६०९ बसस्थानकात इलेक्ट्रॉनिक बोर्ड 
एखादी बस स्थानकात वेळेवर पोचत नाही. त्या गाडीला अनेक कारणांमुळे उशीर होतो. त्याचा परिणाम अन्य बससेवांवर होतो. त्यामुळे धावत असलेल्या एसटीचा ठावठिकाणा समजण्यास मदत होईल. या यंत्रणेमुळे नियोजित आणि अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास याची माहितीही महामंडळाला समजेल आणि चालक व वाहकांवर कारवाई करता येईल. ६०९ बसस्थानक व आगारात इलेक्ट्रॉनिक बोर्डही बसविले आहेत. त्यामुळे बसचा प्रवाशांना ठावठिकाणाही समजेल. या यंत्रणेसाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्षही तयार केले जाणार आहे. 

अपघात झाल्यास ठावठिकाणा समजणार 
एखाद्या बसला अपघात झाला तर व्हिटीएस यंत्रणेची एसटीला मदत होईल. बसचा ठावठिकाणा समजल्यानंतर तत्काळ मदतकार्य पोचवता येईल. तसेच बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनाही त्याची माहिती देऊन अन्य पर्याय दिला जाईल. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar parivahan bus tracking system passenger current position