दूर देशी गेला पोस्‍टमन..सायकलवर येणारा खाकीतील तो आता येईना!

योगीराज ईशी
Monday, 2 November 2020

पूर्वी पोस्टमनची हाक ऐकू आल्यावर लहान- मोठे धावत यायचे. पोस्टमनचा आधार होत असे पत्र हाती पडताच घरातील मंडळी आनंदित व्हायची. परंतु आता मोबाईलमुळे व्हिडिओ कॉलिंग, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, ईमेल अत्याधुनिक साधनांमुळे तात्काळ वार्तालाप होत आहे.

कळंबू (नंदुरबार) : गावोगावी तसेच शहरातील गल्लीबोळातील प्रत्येक परिवारातील सदस्य एका व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत होते. तो म्हणजे खाकी गणवेशातील सायकलवर येणारा दारावर टिकटिक करणारा पोस्टमन. पण आता बदलत्या काळानुसार पोस्टमनची प्रतीक्षा करण्याची वेळ संपत चालली आहे. दारावर वाजणारी टिकटिक किंवा पोस्टमन हा शब्द कानी पडणे दुर्मिळ होत चालले आहे.

पूर्वी पोस्टमनची हाक ऐकू आल्यावर लहान- मोठे धावत यायचे. पोस्टमनचा आधार होत असे पत्र हाती पडताच घरातील मंडळी आनंदित व्हायची. परंतु आता मोबाईलमुळे व्हिडिओ कॉलिंग, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, ईमेल अत्याधुनिक साधनांमुळे तात्काळ वार्तालाप होत आहे. पोस्टमनच्या हातात एखादा टेलिग्राम दिसला की मनात वादळ निर्माण व्हायचे. पत्रांमध्ये आनंद असो की दुःखाच्या समाचार असो; सर्व शेजारधर्म पाळत होते. परंतु आताच्या काळात शेजारधर्म पाळण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याचे दिसून येते. 

‘एटीएम’ने फाडली मनीऑर्डर
एकेकाळी पोस्टमनला ग्रामीण भागात देवदूत समजले जात होते. अशिक्षित लोकांना पत्र वाचून दाखवणे मनीऑर्डरने आलेले पैसे घरोघरी पोहचविणे त्यांचे काम होते. पण आता मनीऑर्डर जवळपास बंद झाल्यातच जमा आहेत. ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीच्या खिशात एटीएम कार्ड आहेत. हाताशी मोटर सायकल आली. क्षणार्धात एटीएमवर जाऊन पैसे काढता येऊ लागलेत. परंतु मनीऑर्डर घेऊन येणाऱ्या पोस्टमनला पाहून जो आनंद होत होता. तो आता एटीएममुळे होत नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे अत्यंत उपयोगी ठरलेली सेवा आता संपत आली आहे. याची जागा मोबाईल फॅक्स ई-मेल ने घेतली आहे. 

टपाल खात्‍यानेही टाकली कात
आज घडीला विदेशातील दूर गावी असलेले चित्र नातेवाईक लॅपटॉप संगणकावर मोबाईलवर ऑनलाइन चॅटिंग व्हिडिओ कॉल करू शकतात. शेवटी काय तर अत्याधुनिक सेवेमुळे फायदा होत असला तरी माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. हे मात्र नक्की दरम्यान टपाल खात्यानेही आता कात टाकली आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर टपाल खात्यातील होत असला तरी पूर्वीची मजा काही औरच असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.

आमच्या काळामध्ये गावात पोस्टमन आला तरी नागरिकांची त्यांच्याभोवती होणारी गर्दी ठरलेली असायची. आमचं काय आहे का? आमचं पत्र आलंय का? आमची मनीऑर्डर आलीय का? असे पोस्टमनला विचारले जात होते. त्यामुळे पोस्टमनलाही विशेष महत्व होते. मात्र, आता सध्याच्या काळात ग्रामीण भागात क्वचितच असे चित्र दिसून येते.
- दंगल बोरसे, ज्येष्ठ नागरिक कळंबू, ता. शहादा

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar postman not come village on social media uses