पक्ष सोडून गेलेल्‍यांची लवकरच घरवापसी : मेहबूब शेख 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

मागील वर्षी झालेल्या विधानसभेचा निवडणुका आणि त्यानंतर पसरलेली कोरोनाची साथ त्यामुळे कार्यकर्त्यांना संपर्क साधता येत नव्हता. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संघटनात्मक दौरे सुरू करण्यात आले आहेत 

नंदुरबार  गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडून गेलेले आहेत; त्यांची लवकरच घर वापसी होणार आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या योग्य व जुन्या कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येईल. साधारणतः महिनाभरात वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक आढावा व कोरोना काळात केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख शनिवारी नंदुरबार दौऱ्यावर आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांचा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद गावित, युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती एम.एस गावित, राजेंद्र पाटील,अमृत लोहार, हेमलता शितोळे उपस्थित होते. 
पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, मागील वर्षी झालेल्या विधानसभेचा निवडणुका आणि त्यानंतर पसरलेली कोरोनाची साथ त्यामुळे कार्यकर्त्यांना संपर्क साधता येत नव्हता. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संघटनात्मक दौरे सुरू करण्यात आले आहेत 

दोन आमदार देऊ 
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातून निवडणूक लढविली नाही, ही घोडचूक आता पक्षाचा लक्षात आली आहे. पण पुढील निवडणुकीत योग्य वाटाघाटी करून उमेदवार घड्याळ या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून दोन आमदार निवडून देण्याच्या प्रयत्न करणार असल्याचा विश्वास शेख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

जिल्हा दौऱ्यासाठी आरोग्यमंत्र्यांना विनंती 
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नांच्या संदर्भात तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदांची संख्याही मोठी असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समोर समस्या मांडणार आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती शेख यांनी दिली. 

निष्ठावंतांनाच संधी 
सर्वच पक्षात गटबाजी असते. गटबाजी असणे म्हणजेच पक्ष वाढण्याची चिन्हे असतात. मागील पाच वर्षाच्या कालावधीत ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षासाठी कामे केली असतील त्यांनाच महामंडळ, शासकीय समित्या व पक्षाच्या पदांवर नियुक्ती करण्याचा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आहेत. त्यामुळे जुन्या व निष्ठावंतांनाच प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar rashtrawadi youth congress State president mehbub shekh press