आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी 

निलेश पाटील
Friday, 6 November 2020

आरटीई प्रवेशासाठी १७ मार्चला प्रवेशाची पहिली लॉटरी करण्यात आली आहे. या लॉटरीत ज्या मुलांचे आरटीई अंतर्गत प्रवेश जाहीर झाले. अशा मुलांचे २७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश करण्यात आले.

शनिमांडळ (नंदुरबार) : राज्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खाजगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत ७९ हजार ५८० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २९ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली होती. परंतु प्रवेशाच्या अद्यापही ३५ हजाराहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी आणखी एक आठवडा मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली. 

आरटीई प्रवेशासाठी १७ मार्चला प्रवेशाची पहिली लॉटरी करण्यात आली आहे. या लॉटरीत ज्या मुलांचे आरटीई अंतर्गत प्रवेश जाहीर झाले. अशा मुलांचे २७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश करण्यात आले. त्यानंतर ३० सप्टेंबर ते २९ ऑक्‍टोबर या कालावधीत प्रतीक्षा विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. तरी अद्यापही जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक आठवडा प्रवेशाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ३१ ऑक्‍टोबरपर्यंत रिक्त जागांचा आढावा घेण्यात येणार असून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत मिळाला चांगला प्रतिसाद
आरटीई प्रवेशासाठी यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गेल्यावर्षी ७८ हजार ७२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर यंदा ७९ हजार ५८० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तरीदेखील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी एक आठवडा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशीत विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे, असे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले. 

तरीही जागा रिक्‍त
राज्यात नऊ हजार ३३१ शाळांमध्ये यंदा एक लाख १५ हजार ४७७ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दोन लाख ९१ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यातील पहिले लॉटरी तसेच प्रतीक्षा यादीसाठी तब्बल १ लाख २५ हजार ९१८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यातील ६७ हजार ४६९ विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात आले आहेत, तर ७९ हजार ५८० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे राज्यात अद्यापही प्रवेशासाठी ३५ हजार ८९७ जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
 
संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar rte school admission one chance