सातपुड्यातील विद्यार्थी करताहेत ऑनलाइन अभ्यास 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

“‘व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून शिकवणी’या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालक खूप उत्तम प्रतिसाद देत आहेत. आश्रमशाळा पुन्हा सुरु होईपर्यंत हा उपक्रम कायम राहणार आहे. घरी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये हाच या उपक्रमामागचा मानस असल्याचे 
- निर्मल माळी,मुख्याध्यापक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा 

नंदुरबार : विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य असावे, याकरिता आदिवासी विकास विभागाचा इंग्रजी माध्यमाचा शाळेने सोशल मीडियाद्वारे शिकवणी वर्ग सुरू केला आहे. सातपुड्याचा कुशीतील अतिदुर्गम भागात असा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला विद्यार्थीही प्रतिसाद देत आहेत. 

नक्‍की पहा - गृहमंत्रालयात उपासमारीची तक्रार; तरुणाला मिळाले तत्काळ धान्य

लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व आश्रमशाळा बंद ठेवण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकवणीत खंड पडून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेत प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘व्हॉट्स ॲपच्या’ माध्यमातून शिक्षण हा उपक्रम येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेने सुरु केला आहे. मुख्याध्यापक निर्मल माळी यांनी सुचवलेली ही संकल्पना शाळेतील सर्व शिक्षकांच्या सोबतीने गेल्या आठ दिवसांपासून राबवण्यात येत आहे. पहिली ते दहावीचे एकूण दहा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक ग्रुपचा ॲडमीन त्या त्या वर्गाचा वर्गशिक्षक आहे. सर्व शिक्षकांसह मुख्याध्यापकांचा एक आणखी व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना कोणता अभ्यास द्यायचा, यावर चर्चा होऊन वर्गशिक्षक आपआपल्या वर्गाच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर रोजची अभ्यासाची ऍक्टिव्हिटी पाठवतात. त्यानुसार विद्यार्थी आपला अभ्यास करतात. 

असा चालतो अभ्यास 
सुरुवातीला विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्रास होऊ नये, याकरिता इंग्रजी डिक्टेशन, व्याकरण, गणिती सूत्रे, कोडी, आकृत्या काढणे, यासारखा अभ्यास देण्यात येत आहे. तसेच विविध शिक्षकांच्या अभ्यासाचे व्हिडिओ आणि ऑडिओ या व्हॉट्स ॲप ग्रुपवर पाठवण्यात येत आहे. या माध्यमातूनही अभ्यास करणे विद्यार्थ्यांना सोपे जात आहे. वर्गशिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण झाल्यावर त्याविषयीचे छायाचित्र आणि विद्यार्थी मनापासून अभ्यास करत असल्याचे छायाचित्र विद्यार्थ्यांचे पालक त्या त्या इयत्तेच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर पाठवत आहेत. 

शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान  
व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून अभ्यास ही संकल्पना राबवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून अँड्रॉईड मोबाईल आहे का, याची खात्री आश्रमशाळा शिक्षकांकडून करण्यात आली. जर पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नसेल तर विद्यार्थ्यांचे भाऊ किंवा बहीण जे अँड्रॉईड मोबाईल आणि इंटरनेट वापरतात असे मोबाईल क्रमांक घेण्यात आले. जर घरात कोणाकडेच अँड्रॉईड मोबाईल नसेल तर घराच्या आजूबाजूच्या व्यक्तींकडे अँड्रॉईड मोबाईल असेल तर त्यांचे क्रमांक घेऊन त्या विद्यार्थ्याच्या नावानिशी व्हॉट्स ॲपच्या समूहात समाविष्ट करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar satpuda aria aadivashi student online study