नंदुरबार, शहाद्यात रस्ते निर्मनुष्य 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या चारशेकडे वाटचाल करीत आहे. तर मृतांची संख्या वीसीकडे जात आहे. त्यातच नंदुरबार हॉट स्पॉट होण्याचा वाटेवर आहे. तर शहादाही आता त्या दिशेने वाटचाल करीत आहे.

नंदुरबार : जिल्ह्यात, विशेषतः नंदुरबार व शहादा शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. हे थैमान संपर्क साखळीतून सुरू झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे. त्यामुळे ती साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन हाच एक उपाय आहे. त्या पाश्वर्भूमीवर व्यापाऱ्यांना वेठीस न धरता केवळ दर रविवारी कडक संचारबंदी ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या पाश्वर्भूमीवर नंदुरबार शहरवासीयांनी आजचा दुसरा रविवार व शहादेकरांनी पहिला रविवार अत्यंत कडकडीत बंद पाळून प्रशासनाचा आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिला. 
जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या चारशेकडे वाटचाल करीत आहे. तर मृतांची संख्या वीसीकडे जात आहे. त्यातच नंदुरबार हॉट स्पॉट होण्याचा वाटेवर आहे. तर शहादाही आता त्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे दिवसागणिक वाढणारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी गेल्या रविवारी नंदुरबारवाशियांना आदेश काढून कोरोनामुक्त शहर होत नाही ,तोपर्यंत दर रविवारी कडकडीत संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या रविवारी अत्यंत कडकडीत बंद पाळण्यात आले होते. आता याही रविवारी नंदुरबारवाशियांसोबतच शहादेकरांनाही आदेश देण्यात आले होते. त्यामुळे दोन्हीही शहरातील नागरिकांनी प्रामाणिकपणे बंद पाळून संचारबंदी यशस्वी केली आहे.संचारबंदी काळात नंदुरबार शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. काही ठिकाणी मुले क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होते. मात्र पोलिसांची गाडी येताच त्यांनीही पळ काढला होता. 

शहाद्यात शुकशुकाट 
शहादा शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सकाळी नऊ ते रात्री बारापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याने शहरात आज सर्व व्यवहार बंद होते. रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट होता. मुख्य बाजारपेठ व ठीक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. तरीदेखील काही नागरिक सकाळी मोटारसायकलीने फेरफटका मारताना दिसून आले. विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. दुपारनंतर मात्र शहरात स्मशान शांतता होती. 
बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची साखळी तोडण्यासाठी शहरात आज रविवारी सकाळपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली होती.गेल्या तीन महिन्यात रुग्ण संख्या ७० पर्यंत पोहचली असून त्यात काहींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून नागरिक ऐकण्याच्या तयारीत नव्हते.अखेर वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस शहर पूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यांअनुशंगाने आज संचारबंदी लागू करण्यात आली होती. औषधांची दुकाने ,दवाखाने व दूध विक्री वगळता सर्वच प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. एरव्ही संचारबंदीतही हातगाड्यांवर भाजीपाला व फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनीही आज संचारबंदीचा धसका घेत आपले व्यवसाय बंद ठेवले होते. प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे,पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, मंडळ अधिकारी पी. बी. अमृतकर सकाळपासूनच शहरात संचारबंदीबाबत माहिती घेत फेरफटका मारला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar shahada sonday janta curfew