नंदुरबारात साकारणार पालिकेची प्रशस्त इमारत !

धनराज माळी  
Wednesday, 22 July 2020

शहराच्या विकासासोबतच पालिकेची स्वतंत्र प्रशस्त इमारत असावी, हे स्वप्न माजी आमदार रघुवंशी यांचे होते. त्यांनी जुनी पालिका नष्ट करून त्या ठिकाणी पालिकेच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी व्यापारी गाळे तयार केले.

नंदुरबार ः अखेर अनेक अडचणींवर मात करीत नंदुरबार पालिकेची दुमजली प्रशस्त इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी लागणारा निधीही पालिकेला शासनाने दिला असून, पालिकेने बांधकामासाठीची निविदाही काढली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत नंदुरबार शहराच्या विकासातील महत्त्वाचे काम म्हणून ही इमारत आकारास येणार आहे. एखाद्या महापालिकेचीही नसावी, अशी इमारत नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातील शहरात साकारली जाणे म्हणजे नंदुरबारकरांसाठी अभिमानाची बाब ठरणार आहे. 

नंदुरबार पालिकेच्या माध्यमातून व आपल्या राजकीय वर्चस्वाचा उपयोग करीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार शहर स्मार्टसिटी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील स्वच्छता असो की सांडपाण्याचे नियोजन, चकाकणारे रस्ते, इतरत्र कुठेही नसावी अशी नाट्यगृहाची वास्तू, वॉटर पार्क, आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, शहराची शोभा वाढविणारे गार्डन, व्यापारी संकुले या सर्व बाबींचे अत्यंत बारीक नियोजन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केले आहे. त्यांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे मार्गदर्शन असल्याने आदिवासी जिल्ह्यातील दुर्लक्षित व अविकसित वाटणाऱ्या या शहराला स्वच्छ व सुंदर शहर बनविले आहे. तेवढ्यावरच न थांबता या शहराची वाटचाल आता स्मार्टसिटीकडे सुरू आहे. स्मार्टसिटीसाठी शासनाच्या असलेल्या निकषाचा विचार केल्यास आजही या शहरात पालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व माजी आमदार रघुवंशी यांच्या प्रयत्नांमुळे स्मार्टसिटी म्हणून हे शहर सज्ज झाले आहे. 

शहराच्या विकासासोबतच पालिकेची स्वतंत्र प्रशस्त इमारत असावी, हे स्वप्न माजी आमदार रघुवंशी यांचे होते. त्यांनी जुनी पालिका नष्ट करून त्या ठिकाणी पालिकेच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी व्यापारी गाळे तयार केले. त्यानंतर जुने न्यायालय असलेली जागा शासनाकडून पालिकेची इमारत उभारण्यासाठी मागितली. त्यासाठी अनेक अडथळे आले, ते पार करीत ती जागा पालिकेला मिळाली, त्यानंतर त्या ठिकाणी प्रशस्त इमारत बांधकामाची तयारी सुरू झाली अन् इमारत बांधकामासही विरोध झाला. त्यात राजकारण असो की मग विरोधाला विरोध असो, ते प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. त्यामुळे आतापर्यंत पालिकेची प्रशस्त इमारत साकारून नंदुरबारकरांचा पालिकेचा व्यवहार तेथे सुरू झाला असता. मात्र दुर्दैवाने न्यायालयीन लढाई पालिका प्रशासनाला लढावी लागली. त्यातून मार्ग निघाला.

 

पालिका इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे १५ कोटी रुपये खर्चाची दुमजली प्रशस्त इमारत साकारण्याचा प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा कोटींचा निधी पालिकेला दिला आहे. या प्रशस्त इमारतीत आधुनिक पद्धतीचे फर्निचरही असणार आहे. त्यासाठी पाच-सहा कोटी खर्च होतील. प्रशस्त सभागृह, पदाधिकाऱ्यांची दालने, अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठकव्यवस्था यासह विविध सोयी-सुविधा इमारतीत असणार आहेत. एकूण खर्च २३ कोटींपर्यंत जाईल. त्यामुळे अशी प्रशस्त इमारत वर्ष-दीड वर्षात पूर्ण करण्याचा मानस नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांचा आहे. 

आत्तापर्यंत इमारत सज्ज झाली असती. मात्र काही अडचणी आल्या होत्या. त्या दूर झाल्या आहेत. आज श्रावण मासारंभाच्या मुहूर्तावर बांधकामाची निविदा काढण्यात आली आहे. नंदुरबार स्मार्टसिटी आहे आणि त्या शहराला शोभेल अशी प्रशस्त इमारत पालिकेची असणार आहे. 
-माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार  

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar spacious municipal building will be constructed