नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

धनराज माळी
Saturday, 22 August 2020

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे ३० दरवाजे सकाळी अकराला उघडले असून १ लाख ०१ हजार ४७४ क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. हवामान खात्याकडून पुढील ४८ तासात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नंदुरबार : तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील ७२ तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 
जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे ३० दरवाजे सकाळी अकराला उघडले असून १ लाख ०१ हजार ४७४ क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. हवामान खात्याकडून पुढील ४८ तासात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी ३ ला प्रकाशा बॅरेजचे ४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून ६९ हजार ४४२ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे ४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून ६२ हजार ४०८ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

हतनूर आणि सुलवाडे बॅरेज धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. पुढील ७२ तासासाठी नागरिकांनी नदी काठावर जाऊ नये. ऋषीपंचमी निमित्त महिलांनी तापी नदीकाठावर जाऊ नये. आपली गुरे-ढोरे नदीकाठी जाऊ देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

 

संपादन ः राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar tapi river water supply and indication villages