मुलीला सासरी पाठविण्यापुर्वीच घडले अघटीत...डोळ्यादेखतच झाले होत्याचे नव्हते 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

मुलीला बोराडी येथील सासुरवाडीस घेऊन जाण्यासाठी पाहुणे आलेले होते. त्यात मुलीला पाठवणीत देण्यासाठी आणलेले कपडे ,साड्या देखील जळून गेले. माहेरच्या प्रेमाचे प्रतिक असलेले दागिनेही त्या आगीत सापडले.

तळोदा : सासरी जाणाऱ्या मुलीला पाठवणी करताना देण्यात येणारे कपडे , साड्या, दागिन्यासह धान्य व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आमचे सर्व काही जळून गेले. आम्ही रस्त्यावर आलो , आता कसं होईल , असा हुंदका देत आपल्या धगधगत्या घराकडे पाहत तेजा भरवाड आपल्या घराला लागलेली आगीबद्दल सांगत होते. तळोदा अक्कलकुवा बायपास रस्त्यावर असलेल्या भरवाड वस्तीत दुपारी एकला खर्डी नदीतील कचऱ्याला लावलेल्या आगीमुळे तीन घरे जळून खाक झाली. या आगीत भरवाड कुटुंबाचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

अक्कलकुवा- तळोदा बायपास रस्त्यावर खर्डी नदीच्या पुलाजवळ भरवाड कुटुंबे राहतात. त्यात तेजा हरी भरवाड , रेवा हरी भरवाड व हमीर हरी भरवाड या तिन्ही भावांची घरे आहेत. पुरुष सदस्य गायी चारायला तर घरी केवळ महिला व मुली होत्या. त्याच वेळी दुपारी एकला खर्डी नदीत असलेला कचरा जाळण्यात आला. तो कचरा जळाल्यामुळे हवेने त्यातील ठिणगी उडाली व या तिघा घरांना आग लागली. या आगीत गुरांसाठी असलेला चारा , घरातील धान्य , कपडे , कपाट ,दुधाचे कॅन ,संसारोपयोगी साहित्य सारेकाही आगीच्या भस्मस्थानी सापडले. हवेचा वेग जास्त असल्याने आग पाहता पाहता पसरली. त्यात गोवरे , कुटार ,करबाड आदी सुकलेले साहित्य असल्याने आग अधिकच धुमसत होती. 

नववधूचे दागदागिने,कपडेही खाक 
तेजा भरवाड यांच्या मुलीला बोराडी येथील सासुरवाडीस घेऊन जाण्यासाठी पाहुणे आलेले होते. त्यात मुलीला पाठवणीत देण्यासाठी आणलेले कपडे ,साड्या देखील जळून गेले. माहेरच्या प्रेमाचे प्रतिक असलेले दागिनेही त्या आगीत सापडले. त्यामुळे त्या आगीने सारं काही राखरांगोळी केल्याची भावना महिला आणि मुलींच्या रडण्याचा हुंदक्यात ऐकू येत होती. ते कपडे व चीज वस्तू इतरत्र विखुरलेल्या होत्या. 

यांनी घेतली मदतीसाठी धाव 
आग लागल्याचे कळल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व भरवाड नवयुवकांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यात भाजपचे शहराध्यक्ष योगेश चौधरी ,शिवसेनेचे शहर उपप्रमुख जयेश सूर्यवंशी , नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय ,रामानंद ठाकरे , संदीप परदेशी ,विकास मगरे ,वाला भरवाड व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे यांनी भेट दिली. तळोदा व नंदुरबार नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली. 
 
महसूल व पालिका अनभिज्ञ 
एकला लागलेली आग तेथील गुरांसाठी असलेल्या साहित्यामुळे दुपारी चारपर्यंत धुमसत होती. शहरातून अग्निशमन बंब आग विझविण्यासाठी फेऱ्या मारत होते. दुसरीकडे अडीच तासाहून अधिक वेळ पर्यंत आग पसरत होती मात्र महसूल व नगरपालिका प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नव्हता. पालिका व महसूल प्रशासनाची गैरहजेरी घटनास्थळी चर्चेत होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar three home fire and girl sari jwelary