
नंदुरबार शहरात स्वच्छ व सुंदर शहरासाठी एकीकडे पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या घाणीमुळे शहरातील मोकाट जनावरे, डुकरे व कुत्र्यांसाठी जणू काय खाद्य पदार्थाची पर्वणी उपलब्ध झाली आहे.
नंदुरबार : शहरात मोकाट जनावरे, डुकरांसह आता पिसाळलेल्या कुत्र्यांची झुंड फिरू लागले आहे. त्यामुळे या पिसाळलेल्या कुत्र्यांकडून घराच्या ओट्यावर अथवा अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यांना अतीव धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांनो, जरा सांभाळा, आपला चिमुकला अंगणात खेळत असेल तर लक्ष द्या. त्याची काळजी घ्या, अन्यथा आपल्या बाळावरही जीव गमावण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाले आहे.
नंदुरबार शहरात स्वच्छ व सुंदर शहरासाठी एकीकडे पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या घाणीमुळे शहरातील मोकाट जनावरे, डुकरे व कुत्र्यांसाठी जणू काय खाद्य पदार्थाची पर्वणी उपलब्ध झाली आहे. अशा या परिस्थितीत शहरातील गल्लीबोळात मोकाट जनावरे डुकरे व कुत्र्यांची झुंड फिरताना दिसत आहे. गेल्या तीन वर्षापूर्वी पालिकेने शहरात वाढलेल्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी मोहीम राबवली होती. ती मोहीम यशस्वीही झाली होती. त्यावेळेस आरोग्य सभापती म्हणून शकुंतलाबाई माळी यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी शहरात स्वच्छता राखणे बरोबरच मोकाट जनावरे, डुकरे व कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यावर विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे कुत्र्यांच्या वावर शहरात कमी झाला होता. मात्र सध्या कुत्र्यांची संख्या शहरात वाढली आहे.
कुत्र्यांवर रोगाचा प्रादुर्भाव
कुत्र्यांवर विशिष्ट प्रकाराच्या आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यात कुत्र्यांना शरीरावर जखमा होणे कुत्र्यांच्या शरीरावरील केस गळणे यासह अनेक लक्षणे दिसून येत आहेत. त्यातच कुत्रे पिसाळलेल्या अवस्थेत फिरताना दिसतात अशा परिस्थितीत वृद्ध व्यक्ती किंवा लहान बालकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींसह वाहनांच्या सुद्धा पाठलाग ही पिसाळलेली कुत्री करू लागले आहेत. कुत्रा पाठीमागे लागणे इथपर्यंतची घटना ठीक आहे. बालकांवर हल्ला चढवून लचके तोडणे ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. त्याचे जिवंत उदाहरण नेहरूनगरमधील हिताक्षी महाजन या चिमुकलीचा मृत्यूची घटना आहे. मात्र या घटनेपासून शहरातील प्रत्येक पालकांनी आजच्या परिस्थितीत बोध घेणे गरजेचे आहे. पुढील धोका टाळावा म्हणून अनेक सामाजिक व राजकीय व्यक्तींकडून एवढेच आव्हान केले जात आहे; की पालकांनो आपल्या चिमुकल्या कडे लक्ष द्या, शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांची झुंड फिरत आहे. त्यांच्यापासून धोका आहे.
साक्री नाका रस्त्यावर मांसाचे तुकडे
साक्री नाका रस्त्यावर गेल्या काही दिवसापासून मांसाचे तुकडे पडलेले आढळून येत आहेत. त्या तुकड्यांना पाहून माणसांना किडस वाटत असले, तरी त्याठिकाणी मात्र कुत्र्यांची झुंड व डुकरांच्या कडप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. याकडे काही ही नगरसेवकांनी लक्ष दिल्यावर पालिका प्रशासनाने तात्काळ त्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली त्यामुळे तो परिसर आज स्वच्छ झाला.
संपादन ः राजेश सोनवणे