esakal | उंदीर नेताय सोने बिळात
sakal

बोलून बातमी शोधा

white gold cotton farm

परतीच्या पावसाने विश्रांती दिल्याने तसेच ऑक्टोबर हिटमुळे कपाशीची बोंड फुटली आहेत. मात्र कापूस वेचण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर शोधताना नाकी नऊ आले आहेत.

उंदीर नेताय सोने बिळात

sakal_logo
By
योगेश ईशी

कळंबू (नंदुरबार) : सध्या कळंबूसह परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची बोंडे फुटली आहेत. फुटलेल्या कापसामुळे शेतीशिवाराने जणू पांढरी चादरच ओढल्याचं चित्र निर्माण झालंय. पण, फुटलेला कापूस वेचण्यासाठी मजूरच मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. मजुरीचे दरही वाढले असून मजुरांच्या कमतरतेनं शेतकऱ्यांची चिंता वाढतच आहे.

परतीच्या पावसाने विश्रांती दिल्याने तसेच ऑक्टोबर हिटमुळे कपाशीची बोंड फुटली आहेत. मात्र कापूस वेचण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर शोधताना नाकी नऊ आले आहेत. मजूर मिळत नसल्याने कापूस जमिनीशी लोळण घेऊ लागला आहे. त्‍यात उंदीर कापूस बिळात नेत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

मजुरी वाढवूनही मिळेना मजूर
मोठ्या प्रमाणात फुटलेला कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने अनेकांचा कापूस वेचणीचा बाकी आहे. कापूस वेचणीच्या मजूरीतही मोठी वाढ झालीय. पाच ते सहा रुपये प्रति किलोने कापूस वेचण्याची मजुरी आहे. मागील वर्षी पाच रुपये किलो प्रमाणे कापूस वेचला जात होता. यंदा मात्र कापूस वेचणीच्या मजुरीत वाढ झाली आहे. तरीही कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नाही आहे. वातावरणात कधीपण बदल होत असल्याने, परतीचा पाऊस आल्यास कापसाचं नुकसान होण्याची भिती आहे. 

म्‍हणूनच उंदरांना फावतेय
खरिब पिकांतील बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग काढणीला वेग आला असून, रब्बीची दादर, हरभरा, गहू पेहरणी साठी शेतकरी शेतातील मशागत करताना व्यस्त दिसून येत आहे. सोयाबीन, मका, भुईसपाट झाली. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. कापसाची वेचणी केली नाही तर कापसाची प्रतवारी खराब होतेच शिवाय उंदीर कापूस बिळात नेत आहेत त्याचा परिणाम कापसाच्या किमतीवर होत असते. परिणामी बळीराजाला आर्थिक फटका बसतो. त्यासाठी मजुरांची शोधमोहीम सुरू आहे.