पांढरं सोन काळवंडत चाललंय; सीसीआयची कापूस खरेदी धिमी

बळवंत बोरसे
Saturday, 23 May 2020

शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. यात नोंदणी केलेले शेतकरी आपला नंबर कधी लागेल या आशेवर बसलेले आहेत. पंधरराजूनपर्यत आपला कापूस खरेदी न झाल्यास काय असा यक्षप्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी आजपर्यत केवळ तीसच टक्के शेतकऱ्याच्या कापसाची खरेदी झाले आहे. 

नंदुरबार : जिल्ह्यात शहादा आणि नंदुरबार येथे कापूस पणन महासंघातर्फे कापूस खरेदीकेंद्र सुरू करण्यात आली असली तरी धिम्या गतीने खरेदी, प्रत्येकी एकच ग्रेडर, तयार झालेल्या गाठी साठविण्यासाठी अपुरी जागा आण एकूणच सीसीआयची उदासिनता यामुळे पावसाळा तोंडार येऊनही जिल्ह्यात आजमितीस ४० टक्के शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. यात नोंदणी केलेले शेतकरी आपला नंबर कधी लागेल या आशेवर बसलेले आहेत. पंधरराजूनपर्यत आपला कापूस खरेदी न झाल्यास काय असा यक्षप्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी आजपर्यत केवळ तीसच टक्के शेतकऱ्याच्या कापसाची खरेदी झाले आहे. 

नक्‍की पहा - लॉकडाऊनमध्येही "नथीचा नखरा' का आहे हिट...युवतींनी घेतले चॅलेंज
 

सीसीआयतर्फे खरेदीसाठी शहादा बाजार समितीकडे २२४८ तर नंदुरबार बाजार समितीकडे ३६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. नंदुरबार येथील बाजार समितीच्या पळाशी केंद्रात नवापूर, तळोदा, अक्कलकुवा हे तालुकेही जोडलेले आहेत. शहादा बाजार समितीत आजअखेरपर्यत ६७५ शेतकऱ्यांचा अठरा हजार क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. नंदुरबार येथे अकराशे शेतकऱ्यांच्या ३६ हजार क्विटल कापसाची खरेदी झालेली आहे. दोन्ही ठिकाणी दररोज किमान ४० वाहनांतील कापसाची खरेदी होत आहे. ही स्थिती पाहता नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्याच कापसाची खरेदी कधी होणार याची चिंता आहे. 

खरेदीतील अडचणी अशा 
बाजार समितीतर्फे खरेदी केलेल्या कापसाच्या गाठी करण्यासाठी तो लगेच जिनिंगमध्ये न्यावा लागतो. त्या जिनिंगशी सीसीआय तसा करारनामा करते. शहादा येथे दोन जिनिंगची गरज असताना सध्या एकच सुरू आहे. तर नंदुरबार येथे तीन जिनिंगची गरज असताना दोनच सुरू आहेत. दररोज येणारा कापूस लगेच जिनिंगमध्ये जात नसल्याने साठविण्यासाठीची जागेची अडचण पाहता खरेदीची प्रक्रिय काहिशी संथ गतीने सुरू आहे. दुसरीकडे एकेकच ग्रेडर असल्याने मर्यादा येतात. शासनाकडे पाठपुरावा करूनही दुसऱ्या ग्रेडरची नियुक्ती न झाल्यानेही खरेदीची प्रक्रिया संथ आहे. नंदुरबार बाजार समितीने तिसरी जिनिंगबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे. 

शिल्लक कापसाची माहितीच नाही
शहादा आणि नंदुरबार येथील बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या पाच हजार ८४८ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करणे क्रमप्राप्त आहे. मात्र त्यातही नेमका किती कापूस शिल्लक आहे याची माहिती बाजार समितीतकडे नाही. प्रशासनाने कृषि सहाय्यकांमार्फत गावागावो त्याचा पंचनामा करून घेतल्यास नेमक्या स्थितीचा अंदाज येऊ शकेल, अन्यथा पावसाळा सुरू झाल्यानंतर सीसीआय हात वर करेल अन शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ येईल. जिल्हाधिकारींनी घेतलेल्या बैठकीत सर्व कापूस खरेदी करण्यासाठी पावले उचलावित असे महिन्याभरपूर्वी सांगितले होते,मात्र त्यादृष्टीने सीसीआय आणि कृषि विभागाने मात्र कार्यवाही केलेली नसल्याने शेतकरी आज कापसाकडे नर लावून बसला आहे. 

संपुर्ण खरेदीसाठी मंत्री थोरातांना विनंती 
नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यातील जवळपास चाळीस टक्के शेतक-यांचा कापूस अद्याप घरातच पडून आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याकडील कापूस खरेदी न झाल्यास आधीच गांजलेला शेतकरी कोलमडून पडेल, त्यासाठी वेळेत शासनामार्फत (सीसीआय मार्फत) पुर्ण क्षमतेने कापुस खरेदी व्हावी.सद्यःस्थितीत नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ हजार सहाशे शेतकरींनी नोंदणी केली असून अद्याप एक लाख ते दिड लाख क्विंटल कापुस शेतकरी बांधवांच्या घरात पडून आहे. शासनाने युद्ध पातळीवर शेतक-याच्या संपूर्ण कापसाचे खरेदी करावी यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे अशी विनंती माजी आमदार चंद्रकातं रघुवंशी यांनी सहकरामंत्री बाळाहेब थोरात यांना केली आहे. 

तर शेतकऱ्यांसमोर आर्थिक समस्या 
नंदुरबार तालुका बाजार समिती तसेच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी याबाबत राज्याचे पणन संचालक आणि सहकार व पणनमंत्री बाळासाहेब थोरात यांना स्वतंत्रपणे पत्र लिहित या स्थितीबाबात अवगत केले आहे. एखट्या नंदुरबार तालुक्यात ४० टक्के शेतकऱ्यांचा कापूस अद्याप घरातच पडून आहे. तो तत्काळ खरेदी करण्यात यावा असे सभापती किशोर पाटील यांनी म्हटले आहे. पावसाळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला असून कापूस विकला गेला नाही तर शेतक-याला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. सीसीआयमार्फत पुर्ण क्षमतेने कापूस खरेदी न झाल्यास शेतकरींना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar white gold cotton stay farmer home cci slow kharedi