मजुरांना घेवून जाणाऱ्या ट्रॅक्‍टरची ट्रॉलीच उलटली अन्

धनराज माळी
Thursday, 19 November 2020

सातपुड्यातील हजारो आदिवासी कुटुंबांना पोटाची खळगी भरण्यासाठी काम करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रासह, गुजरात राज्यात स्थलांतर करावे लागते. आदिवासी भागात शेतीकामे संपताच महात्मा गांधीजी जयंतीपासून रोजगार हमी योजनेची कामे सुरू होणे आवश्यक आहे.

धडगाव (नंदुरबार)  : वलवाल- मोखाचापाडा (ता. धडगाव) येथील ३५ मजुरांना बाहेरगावी मजुरीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धावलघाट गावाजवळ शहादा- धडगाव रस्त्यावर अपघात झाला. ट्रॅक्टरची ट्राली उलटल्याने चार मजूर गंभीर जखमी, तर इतर किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती धडगाव येथे कळताच जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जखमींना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 
बुधवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास रोजगारासाठी वलवाल मोखाचापाडा (ता. धडगाव) येथील मजूर गुजरात राज्‍यात जात होते. त्यासाठी अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्यासह ३५ मजूर ट्रॅक्टरने गुजरातकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, धडगाव- शहदा रस्त्यावर धावलघाट गावाजवळ ट्रॅक्टरचा अपघात झाला. त्यात ट्रॉली उलटली. ट्रॉलीत बसलेले मजूर जखमी झाले. त्यांच्या अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्यही रस्त्यावर पडले. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती धडगाव येथे मिळताच शिवसेना नेते विजय पराडके यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली. जखमी मजुरांना तत्काळ म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांचावर उपचार केले. जखमींची नावे कळू शकली नाहीत. 

स्थलांतर उठले जीवावर 
दरवर्षी सातपुड्यातील हजारो आदिवासी कुटुंबांना पोटाची खळगी भरण्यासाठी काम करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रासह, गुजरात राज्यात स्थलांतर करावे लागते. आदिवासी भागात शेतीकामे संपताच महात्मा गांधीजी जयंतीपासून रोजगार हमी योजनेची कामे सुरू होणे आवश्यक आहे. तसे शासनाचे धोरणही आहे. मात्र, प्रशासनाने येथे कामच सुरू केलेले नाही. स्थानिक ठिकाणी कामे नसल्याने धडगाव- अक्कलकुवा तालुक्यातील शेतमजूर बेरोजगार झाला आहे. भूमिहीन शेतकरी उपासमारीच्या खाईत ढकलला गेला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांना जीव धोक्यात घालून स्थलांतर करावे लागते. कित्येक मजुरांना जीवही गमवावा लागला आहे. प्रशासनाने दखल घेऊन रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी छोटू वळवी यांनी केली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar worker transfer travling tractor and trolly accident