खाते बदलले अन्‌ सभापतीच गाफिल...कॉंग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी 

धनराज माळी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जिल्हा परिषदेत राज्याच्या पॅटर्नप्रमाणे सत्ता स्थापन झाली असली तरी किंगमेकर असलेल्या शिवसेनेला उपाध्यक्ष पद मिळाले. सुरुवातीच्या काळी निवडीवेळी घडलेल्या परिस्थितीनुसार भाजपलाही एक सभापतिपद मिळाले. उर्वरित पद काँग्रेसने आपल्याकडे ठेवले.

शहादा : नेता मोठा झाल्यास कार्यकर्ते आपसूकच मोठे होतात. सोबतच पक्ष वाढीसाठी बळकटी मिळते. पक्ष वाढवण्यासाठी वरिष्ठ नेते सत्ता व महत्वाची पदे आपल्या गटाकडे ठेवण्यासाठी नेहमीच आग्रही असतात, परंतु नंदुरबार जिल्हा परिषदेत घडलेल्या घटनेवरून शहादा तालुक्‍यात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पक्षाकडे असलेले अर्थ व बांधकाम खाते पक्षाचा वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचा सभापतीकडून काढून घेत विरोधी पक्षाला बहाल केले. तेही संबंधित सभापतींना विश्वासात न घेता हा प्रकार झाल्याने शहादा तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ३१) झाली. तीत अर्थ व बांधकाम खात्याचे सभापती अभिजित पाटील यांच्याकडून काढून शिवसेनेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांना देण्यात आले. तर त्यांच्‍याकडील कृषी व पशू संवर्धन खाते अभिजित पाटील यांना देण्यात आले. तो बदल करताना सारे विरोधक व सत्ताधारी एकवटले. अभिजित पाटील यांना विश्वासात न घेता झालेल्या खाते बदलाची चर्चा वाऱ्यासारखी तालुक्यात येऊन पसरली. आपल्या नेत्याकडून महत्त्वाचे पद निघाले म्हणून कार्यकर्त्यांची खदखद नवीन नाही. असे असले तरी जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तालुक्यात काँग्रेसला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी श्री. पाटील यांना पाठबळ देणे आवश्यक होते. असेही काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

आघाडीचा पॅटर्न पण
जिल्हा परिषदेत राज्याच्या पॅटर्नप्रमाणे सत्ता स्थापन झाली असली तरी किंगमेकर असलेल्या शिवसेनेला उपाध्यक्ष पद मिळाले. सुरुवातीच्या काळी निवडीवेळी घडलेल्या परिस्थितीनुसार भाजपलाही एक सभापतिपद मिळाले. उर्वरित पद काँग्रेसने आपल्याकडे ठेवले. सत्ता स्थापन होऊन काही महिने होत नाही, तोच पुन्हा खाते बदलाचे रहस्य शहादा तालुक्यातील श्री. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना बोचणारे ठरले. भविष्यात तालुक्यात पुन्हा काँग्रेसला चांगले दिवस आणण्यासाठी पक्ष पातळीवरून वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाच्या असून कार्यकर्त्यांची नाराजी पक्षासाठी हितावह नसते, असे कार्यकर्ते सांगतात. परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला खाते बदलाचा निर्णय तालुक्यातील काँग्रेस पक्षासाठी काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना बोचणारा ठरला. 
 
कृषी खातेही तेवढेच महत्वाचे 
कार्यकर्त्यांचा भावना लक्षात घेत अभिजित पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करीत कृषी खाते तेवढेच महत्त्वाचे आहे. या खात्यामार्फत शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी मिळाली आहे. कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये; असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar zilha parishad change department congerss sabhapati abhjit patil