जि. प. त चमत्कार, सत्ताधारीच अल्पमतात! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

सभेत विरोध म्हणून विरोध करायचे धोरण विरोधी गटाच्या सदस्यांनी अवलंबले होते. आज कोविड-१९, रस्ते, पाणी टंचाई सारख्या महत्वाचे विषय सभेत होते. त्यावर चर्चा न करताच त्यांना विरोध केला. ते योग्य नाही. आम्ही सर्वांना विश्‍वासात घेऊन कामे करतो. मात्र तरीही आज मतदानाने विषय मंजूर करण्यास ते सांगत होते. ते मान्य नाही. सर्व विषय मंजूर केले. 
- सीमा वळवी, अध्यक्षा, जिल्हा परिषद,नंदुरबार -

नंदुरबार : जिल्हा परिषदेतील संख्याबळानुसार आज झालेल्या सर्वसाधारण सभेवेळी शिवसेनेसह कॉंग्रेसेचे सदस्य मिळून बारा जण अनुपस्थित राहिल्याने तीस सदस्यसंख्या असलेले कॉंग्रेस- शिवसेना हे सत्ताधारी तांत्रिकदृष्ट्या अल्पमतात आले. नेमक्या याच संधीचा फायदा घेत विरोधी गटाच्या भाजपच्या उपस्थित पंचविस सदस्यांनी प्रत्येक विषयाच्या मंजुरीसाठी हात उंचावून मतदान घेण्याची मागणी केली. यात अंदाजपत्रकासह अने महत्त्वाचे विषय होते. विरोधकांचे संख्याबळ जास्त असल्याने हात उंचावून मतदान घेतले असते तर विरोधकांनी सभापटावरील बहुमतामुळे सर्व विषय नामंजूर केले असते. ही नामुश्‍की टाळण्यासाठी सभेच्या अध्यक्षांनी आपले संवैधानिक अधिकार वापरत सर्व विषय मंजूर केले अन सभा आटोपली. मात्र हा चमत्कार पाहता जिल्हा परिषदेच्या आगामी वाटचालीत काहीही घडू शकते याचे संकेत मिळाल्याचे मानले जात आहे. 
दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी हात उंचावून मतदान घेण्यास नकार दिल्याने नाराज विरोधकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या दालनात धाव घेत कार्यपध्दतीला आक्षेप घेत न्याय मिळाल्यास आपण न्यायालयात जाऊ अशा गर्भित इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपचे विद्यमान सदस्य भरत गावित यांनी दिला. एकूणच जिल्हा परिषदेच्या आजच्या सभेतील घडामोडींनी जिल्ह परिषदच्या राजकारणात नवा ट्विस्ट आल्याचे मानले जात आहे. 
कोरोनाचया पार्श्‍वभूमीवर आज दुपारी दोनला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्षा सीमा वळवी होत्या. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अँड राम रघुवंशी, बांधकाम सभापती अभिजित पाटील, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बाल कल्याण सभापती निर्मला राऊत, शिक्षण सभापती जयश्री पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे आदी उपस्थित होत्या. 
विशयपत्रिकेवर पाणीटंचाई, रस्ते, कोविड-१९, २०२० -२१ चे मूळ अंदाज पत्रकाचा समावेश होता. विरोधी गटाचा सदस्यांना विश्‍वासात न घेता कामे मंजूर केले जात असल्याचा आरोप करीत विषयपत्रिकेवरील विषयांना मंजुरी देतांना मतदान घेण्यात यावे, अशी मागणी भरत गावित यांनी केल्याने सभेत वांदग निर्माण झाले. विरोधी गटाने राडा सुरू ठेवला तर सत्ताधारी गटाने काही वेळेतच सर्वच विषयांना मंजुरी देत सभा आटोपती घेतली. 

विषय पत्रिकेवरील पहिला विषय सदस्यांचा रजेचा अर्ज मंजूर करणे होता. त्यास मंजुरी देण्यात आली. मात्र विषय क्रमांक तीन मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, मागील सभेतील ठरावांवरील पूर्ततेचा आढावा घेणे व सन २०२०-२१ चे मूळ अंदाज पत्रकास मंजुरी देणे या विषयांना विरोधी भाजपच्या सदस्यांना विरोध केला. 
सदस्य भरत गावित यांनी या विषयांना विरोध करीत या विषयांसाठी मतदान घेऊन ते मंजूर करावे,अशी मागणी केल्याने सन्नाटा पसरला, मात्र जि. प. अध्यक्षा सीमा वळवी यांनी असे का हा प्रश्‍न उपस्थित करीत महत्वाचे विषय आहेत त्यावर मतदान घेण्याची गरज नाही असे सांगत त्या विषयांसह विषय पत्रिकेवरील सर्वच २६ विषय मंजूर केले. सभा काही वेळेतच गुंडाळली. त्यात हातपंप विभागातील पदे भरणे, हातपंप दुरुस्तीचे नवीन वाहने खरेदी करणे, जैवविविधता व्यवस्थापन समिती गठीत करणे, सीएससी-एसपीव्ही यांना मोबदला देण्या करिता ग्रामपंचायतींना कर्ज मंजूर कऱणे, जमिनीच्या वाढीव उपकर वाढीच्या मुदतीसाठी प्रस्ताव सादर करणे, नवीन प्रस्तावित नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी देणे, आयत्या वेळेस येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे, आजच्या सभेचे इतिवृत्त कायम करणे आदी महत्वाच्या विषयांचा समावेश होता. 
 
शिवसेनेचेच सदस्य रजेवर… 
शिवसेनेचे सहा जिल्हा परिषद सदस्य आजच्या सभेत अनुपस्थित होते. त्यांनी रजेचे अर्ज पाठविले होते. तर काही काँग्रेस सदस्यही अनुपस्थित होते. एकंदरीत शिवसेनेचे सहा सदस्य व काँग्रेसचे काही सदस्य जे रजेवर होते, ते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मानणारे आहे. त्यामुळे श्री. रघुवंशी यांच्या गटाचेच सदस्य रजेवर का ,असा प्रश्‍न उपस्थितांमध्ये चर्चिला जात होता. मात्र उपाध्यक्ष अँड. राम रघुवंशी उपस्थित होते. 
 
न्यायासाठी कोर्टात जाऊ : गावित 
विरोधी गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांना विश्‍वासात न घेता कामे केली जात आहेत. आम्ही मांडलेले प्रश्‍न व विकास कामांची केलेली मागणी धुडकावून विरोधी गटाच्या सदस्यांचा गटात विकास कामे रोखली जात आहेत. आम्ही त्यानुसार आज बहुमताने विषय मंजूर करण्याची मागणी केली. मात्र तसे न करता अध्यक्षांनी सभा आटोपती घेतली. त्यांना अधिकाऱ्यांनीही साथ दिली. याबाबत आम्ही विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आता न्यायासाठी कोर्टात जाणार आहोत. 
भरत गावित, जि. प. माजी अध्यक्ष व सदस्य 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar zilha parishad meeting sattadhari member